अखेर ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला केले निलंबीत; ड्रंक अॅन्ड ड्राईव्हप्रकरणी मोठी कारवाई,
सासवड : सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शासकीय कामकाजाच्या वेळीच मद्यधुंद अवस्थेत असताना चारचाकी गाडी बेदरकारपणे चालवून एका दुचाकीस जोरदार धडक दिली. तसेच धडक दिल्यानंतर काही अंतर फरफटत नेहून तिथेच जखमी व्यक्तीला सोडून पळ काढला होता. यातील जखमी व्यक्तीचे निधन झाल्यानंतर चालक पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वास्तविक पाहता या संपूर्ण प्रक्रियेत खूप वेळ गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन झाले आहे.
योगेश गरुड असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी आरोपी गरुड याने सोनोरी गावच्या हद्दीतील एका हॉटेल मधून दारू घेतली. त्यानंतर हॉटेल समोरच चारचाकी गाडीत बसून दारूचे अतिसेवन केले. त्यानंतर सायंकाळी सातच्या दरम्यान त्याच अवस्थेत गाडी घेवून सासवडकडे येत होता. त्याचवेळी सासवडकडून सोनोरीकडे येणारे संजय रामचंद्र मोरे यांच्या दुचाकीस विरुद्ध बाजूने चुकीच्या दिशेने येवून जोरदार धडक दिली. तसेच त्याच अवस्थेत काही अंतर फरफटत नेले. त्यावेळी त्यांना मदत करणे अपेक्षित होते. मात्र पोलीस कर्मचारी योगेश गरुड याने तेथून पळ काढला.
दरम्यान त्याचवेळी रत्याने येणाऱ्या काही नागरिकांनी मोरे यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली त्यानंतर त्यांना तातडीने सासवड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या डोक्याला आणि इतर ठिकाणी मोठा मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पुणे येथे हलविण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यानंतर त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पुणे येथे जखमी संजय मोरे यांच्यावर जवळपास सात ते आठ दिवस उपचार सुरु होते, मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. त्यानंतर सोमवारी ७ जुलै रोजी त्यांचे निधन झाले.
अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न
अपघाताची घटना घडल्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपी पोलीस कर्मचारी योगेश गरुड यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र २४ तास तर सोडाच मात्र संपूर्ण आठवडा झाला तरी त्याची वैद्यकीय तपासणी केली नाही. तसेच गरुड याची चारचाकी गाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्याऐवजी वडकी येथील शोरूममध्ये नेवून दुरुस्त देखील करण्यात आली. त्यामुळे एकूणच कोणताही पुरावा राहणार नाही याचीच पोलीस ठाण्याकडून दक्षता घेतल्याचे दिसून आले आहे.
प्रसार माध्यमांपासून माहिती दडविण्याचा प्रयत्न
अपघाताची घटना घडल्यानंतर संपूर्ण तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांकडून स्थानिक पत्रकार आणि इतर प्रसार माध्यमांना माहिती न देता दडवून ठेवण्यात आली. अपघातातील जखमी मोरे यांचे निधन झाल्यानंतर रात्री उशिरा गरुड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याला अटक करून लगेच जामीन मिळेल याचीही दक्षता घेतल्याने लगेचच जामीन झाला.
पोलीस अधीक्षकांकडून निलंबनाचे आदेश
पोलीस कर्मचारी योगेश गरुड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी अटक होवून लगेच जामीनही झाला. त्यामुळे याबाबत पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांना विचारले असता त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शुक्रवारी गरुड यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले.