
सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यास कारावास
कराड : कोर्टाचा निर्णय मला मान्य नाही, असे सांगून ग्रामसेवकासह गावातील प्रतिष्ठित लोकांच्या अंगावर काठी घेऊन धावून येऊन सरकारी कामकाजात अडथळा आणला. याप्रकरणी मरळी (ता.पाटण) येथील एकास कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दोन वर्ष साधा कारावास आणि पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली.
पुरुषोत्तम धोंडजी कदम (वय 74) असे संबंधिताचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, 10 जून 2019 रोजी सकाळी दहा वाजता मरळी (ता.पाटण) येथे एसटी स्टँड ते मातंग वस्तीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे कामकाज पाहण्यासाठी रस्त्याची कॉन्ट्रॅक्टर अमित गव्हाणे, तसेच गावातील सरपंच, उपसरपंच पंचायत समिती सदस्य ठेकेदार माजी जिल्हा परिषद सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ यांना घेऊन ग्रामविकास अधिकारी अमोल विठ्ठल सुळ हे गेले असता सदर रस्त्याच्या लगत असलेल्या शेताचे मालक पुरुषोत्तम धोंडी कदम हे तेथे आले. त्यांनी ‘इथून रोड करायचा नाही’, असे म्हणून रस्त्याच्या कामास अडथळा आणला.
हेदेखील वाचा : जीव घेण्याचा प्रयत्न महागात! कोर्टाने ‘या’ राजकीय नेत्याला सुनावली 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
तसेच रस्त्याचे काम करण्यासाठी हजर असलेल्या लोकांच्या अंगावर काठी घेऊन धावून गेले. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी कोर्टाच्या आदेशाची प्रत त्यांच्याजवळ असल्याचे सांगून रस्ता करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळाल्याचे सांगितले. मात्र, यावेळी आरोपीने मला कोर्टाचा निर्णय मान्य नाही. तुम्ही रस्ता करायचा नाही, असे म्हणून अंगावर काठी घेऊन धावत येत रस्त्याचे कामकाज थांबवले. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी अमोल सूळ यांनी पाटण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि उत्तम भापकर यांनी केला. पाटण न्यायालयात दाखल केलेले दोषारोप पत्र कराड सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. या कामे फिर्यादी अमोल सूळ यांच्यासह सचिन ठोंबरे, राजाराम माळी, कृष्णा कदम, दिलीप कदम यांच्यासह तपासी अधिकारी यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.
सदरील खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी चालवले. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेले साक्षीदारांचा पुरावा व सरकारी विधीज्ञ पुष्पा जाधव यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी हा निकाल सुनावला.
हेदेखील वाचा : दोन सख्ख्या भावांनी केली भावाची हत्या; न्यायालयाने आरोपी भावंडांना सुनावली ‘ही’ शिक्षा