
चोर समजून तिघांना चांगलंच चोपलं; एकाने डोक्यावर रॉड घातला तर इतरांनी...
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एक विचित्र घटना समोर आली. या ठिकाणी ग्रामस्थांनी गावात चोर शिरल्याचे समजून दुचाकीने जाणाऱ्या तिघांना बेदम मारहाण केली. यात हे तिघे जखमी झाले. ही घटना सावली (वाघ) येथे बुधवारी (दि. २६) घडली. रवींद्र झिले (वय २९, रा. टेंबुर्डा, जि. चंद्रपूर), मुस्तफा जावेद खान, रशीद निसार कुरेशी (दोन्ही रा. वीर भगतसिंग वॉर्ड) अशी जखमींची नावे आहे. हे तिघेही पोथरा येथे मालवाहू वाहनातील डिझेल संपल्याने दुचाकीने गेले होते.
चालकाला डिझेल दिल्यानंतर तिघेही हिंगणघाटच्या दिशेने निघाले. त्यांची दुचाकी सावली (वाघ) गावात शिरताच ग्रामस्थांना गावात चोर शिरल्याचा संशय घेतला. याशिवाय तीन ते चार नागरिकांनी दुचाकी चालवत असलेल्या रशीदच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला. यामुळे तिघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर तिघांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
हेदेखील वाचा : प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, सार्वजनिकस्थळी शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या अनुराग पुसनाके (वय २३, रा. संत चोखोबा वॉर्ड हिंगणघाट) याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई कॉटन मार्केट समोर बुधवारी (दि. २६) करण्यात आली. अनुराग हा कॉटन मार्केट समोर शस्त्र घेऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांत दहशत पसरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत त्याला शस्त्रासह ताब्यात घेत अटक केली.
क्षुल्लक कारणातून वाद
दुसऱ्या एका घटनेत, रस्त्यावर मित्रांसोबत बोलत असलेल्या व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना विक्रम शिलानगर येथे घडली असून, या प्रकरणी बुधवारी (दि. २६) तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशोक काटे (वय ५०, रा. विक्रमशिलानगर) यांचा मेसचा व्यवसाय आहे. ते टिफिन पोहोचविण्यासाठी जात होते.
बडबड करतो म्हणून हटकले
मून गॅरेजसमोर सुयोग कांबळे याला टिफिन दिला. ते दोघेही बोलत होते. काही वेळातच पवन पाटील हा घराबाहेर आला व येथे बडबड कशाला करतो, असे म्हणून हटकले. त्यावर अशोक काटे यांनी आम्ही बोलत आहे, असे म्हणताच त्याने मारहाण करून काटे यांना जखमी केले. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला.
हेदेखील वाचा : प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त