इमारत तात्काळ रिकामी करा, अन्यथा...; पुणे विमानतळ प्रशासनाला धमकीचा मेल
पुणे : गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे मेल मिळत आहे. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल ‘स्टार एअर’ विमान कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडीवर रविवारी (दि. २९ जून) पहाटे आला आहे. “विमानतळ परिसरात आणि विमानांमध्ये स्फोटक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. इमारत तात्काळ रिकामी करा, अन्यथा लोकांचे प्राण जाऊ शकतात,” असा मजकूर या मेलमध्ये होता. ‘रोडकिल’ आणि ‘क्यो’ या नावांनी ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेले आदनान शेख (रा. कोंढवा) हे सकाळी ६.४५ वाजता कामावर हजर झाले होते. तेव्हा त्यांनी हा इमेल पाहिला. तात्काळ त्यांनी सुरक्षा यंत्रणांना कळवले. तसेच, सीआयएसएफ, एटीएस, बीडीडीएस आणि विमानतळ प्रशासनाने एकत्रितपणे विमानतळ व विमानांची तपासणी केली. संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आली नाही. घटनेनंतर ‘बॉम्ब थ्रेट अॅसेसमेंट कमिटी’ची बैठक घेतली गेली. तपासणीत ही धमकी ‘नॉन-स्पेसिफिक’ म्हणजेच गंभीर न मानण्याजोगी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
हे सुद्धा वाचा : ड्रंक अँड ड्राईव्ह टेस्टला नकार, फाशी घेण्याची पोलिसांना धमकी; नेमकं काय घडलं?
जबलपूर विमानतळावरही बॉम्ब ठेवण्याची धमकी
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती, परंतु चौकशीनंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अतिरिक्त एसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, जबलपूरच्या दुमना भागातील विमानतळाच्या अधिकाऱ्यांना रविवारी एक ईमेल मिळाला होता, ज्यामध्ये विमानतळावर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर विमानतळ रिकामा करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला. तपासात असे दिसून आले आहे की हा ईमेल एकाच वेळी 40 ते 41ठिकाणी पाठवण्यात आला होता. असे दिसते की एखाद्या खोडसाळ घटकाने हे केले आहे. माहिती मिळताच, दहशतवादविरोधी पथक (एटीएस), श्वान पथक, स्थानिक पोलिस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने विमानतळावर शोध मोहीम राबवली. परंतु तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. यानंतर, सर्व उड्डाणे वेळेवर सुरू करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, विमानतळावर सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता परिस्थिती सामान्य आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्याचे प्रमाण वाढले आहे.