crime (फोटो सौजन्य: social media)
Pune Car Accident : कोरेगाव पार्क- मुंढवा रस्त्यावर ‘हिट अँड रन’ प्रकरण घडला होता. त्यातुन आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. आता आरोपीने एकामागून एक तब्बल आठ वेळा जामिनासाठी अर्ज केला आणि न्यायालयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पुणे सत्र न्यायालयाने आरोपीचे जामीन अर्ज फेटाळून कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीचा नाव आयुष प्रदीप तायाल असे आहे.
आरोपीला धडा शिकवण्याचा निर्णय
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा दंड ठोठावला आहे. त्यांनी आदेशात नमूद केलं आहे की, आरोपीने स्वच्छ हेतूने न्यायालयात येण्याऐवजी खोटेपणा, दिशाभूल आणि माहिती लपविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आणि सरकारी यंत्रणेवर अनावश्यक आर्थिक ताण पडला. त्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण गंभीरपणे घेत आरोपीला दंडात्मक कारवाईद्वारे धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
नेमकं प्रकरण काय?
११ ऑगस्ट २०२४ रोजी आयुष तायाल (34, रा. मगरपट्टा सिटी) याने मध्यरात्री दीडच्या सुमारास दारूच्या नशेत भरधाव ‘ऑडी’ कार चालवत रौफ शेख (21) या डिलिव्हरी बॉयला चिरडले होते. यामुळे रौफचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे.
आठवेळा जामिनासाठी केला अर्ज, मात्र…
आयुष याने आठव्यांदा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सरकारी वकील जावेद खान यांनी याला तीव्र विरोध केला. आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, तसेच पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, अशी भीती तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी त्याच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
15 दिवसांच्या आत दंड जमा करण्याचे आदेश
न्यायाधीश चव्हाण यांनी आदेशात स्पष्ट केलं की, “चांगले पीक घेण्यासाठी चांगल्या बियाण्यांची गरज असते; मात्र बियाणेच खराब असेल, तर पीक अपेक्षित कसे राहील? पक्षकाराचे वर्तन जर अयोग्य असेल, तर अशा प्रकरणांची हाताळणी अधिक सावधगिरीने करावी लागते,” असे त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाने आयुष तायाल याला 15 दिवसांच्या आत हा दंड रक्कम पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करण्याचे आदेश देखील दिले आहेत.