
Pune Crime : तिघी पोलीस ठाण्यात, 'कलेक्टर' मैदानात; त्या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि सर्वाधिक वर्दळीच्या बसस्थानक परिसरातून संशयाच्या आधारे तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी तीन महिलांना (Pune Crime) भरदुपारी पोलीस ठाण्यात आणले. कसून चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्याची झलकही दाखविली. पण, चौकशीच सत्र सुरू असतानाच पोलीस ठाण्यातील ‘कलेक्टर’ची एंट्री झाली अन् प्रकरण भलत्याच दिशेने गेले.
काही वेळातच संपूर्ण प्रकरणाचा सूर बदलला आणि ‘कलेक्टर’ने मध्यस्थी करून प्रकरण हातात घेतले अन् तोडपाणी झाल्याची जोरदार चर्चा सध्या पुणे शहर पोलीस दलात सुरू आहे. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला असून, यामुळे चांगलीच खळबळ देखील उडाली आहे.
माहितीनुसार, बसस्थानकातील आवारात घडणाऱ्या सततच्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस ठाण्यावर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अधून-मधून तपास पथक अन् बंदोबस्तावरील पोलीस तिथे तैनात असतात. रात्रपाळीवरही पोलीस तैनात असतात.
दरम्यान, भरदुपारी तपास पथकाने संशयातून तीन महिलांना पोलीस ठाण्यात आणले अन् चौकशी रूममध्ये नेले. तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी अन् पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. चौकशीचा फास आवळला जात असतानाच पोलीस ठाण्यातील ‘कलेक्टर’ची एंट्री झाली. त्याने या संपूर्ण प्रकरणाची सूत्रे हातात घेतल्यानंतर महिलांकडून तोडपाणी केले आणि त्यांना सोडून दिले, असे बोलले जात आहे.
महिलांची सुटका झाल्यानंतर प्रकरण मिटल्याचे वाटत होते. मात्र, या महिलांनी अचानक सोमवारी रात्री थेट पोलीस आयुक्तालयच गाठले. या महिलांनी आयुक्तालय गाठल्याची खबर जशी मिळाली, तशी तपास पथकाची धांदल उडाली.
तपास पथकाने युद्धपातळीवर धावाधाव करत या तीनही महिलांना आयुक्तालयाच्या दारावरच गाठले अन् त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली. काही वेळाच्या प्रयत्नानंतर या महिलांना पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बराच वेळ समजूत घालण्यात आली. पण, प्रकरण काही संपत नव्हते. दुसरीकडे तोपर्यंत याची खबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली अन् त्यांनी लक्ष घातले.
Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
पोलीस ठाण्याच्या काही अधिकाऱ्यांनी या महिलांची माहिती घेत असतानाच मायानगरीतील एका महिला अधिकाऱ्याची अन् या महिलांची ओळख काढली. त्यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्यास सुरूवात केली. बऱ्याच वेळाने हे प्रकरण मिटल्यानंतर तोडपाणीत घेतलेली मलिदा व्याजासह परत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी नेमके काय झाले? अशी विचारणा केल्याचे समजते. प्रकरण आधीच मिटविल्याने संबंधित महिलांना कोणताही त्रास झाला नसल्याचे दाखविण्यासाठी त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले. त्यांचे जबाबही नोंदवून वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती आहे. हे प्रकरण भोवण्याची शक्यता निर्माण झाल्याने ‘कलेक्टर’ला ५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचेही समजते. याप्रकारामुळे संबंधित पोलीस ठाण्यासह संपूर्ण दलात खळबळ उडाली आहे.