
मित्रांच्या खांद्यावर हात ठेवत गुन्ह्यांच्या मैदानात उडी, बेसुमार पैसा अन्...; वाचा गणेश मारणेचा गुन्हेगारी इतिहास
गणेश निवृत्ती मारणे मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा. पण, शिक्षण अन् शहराच्या ओढीने तोही पुण्यात आलेला. तो वारजेतील जुन्या जकात नाका परिसरात लहानाचा मोठा झाला. काही काळ सुतारदऱ्यातील जयभवानीनगर येथेही राहिला. त्यामुळे त्याला तसा कोथरूडचा पुर्ण परिसर माहिती होता. शिक्षण नसले तरी अत्यंत हुशार आणि तितकाच खुनशी, पण मनात काय हे कळू न देणारा, अशी गणेश मारणेची ओळख. तो गुन्हेगारी वृत्तीचा, किरकोळ गुन्हे करून त्याने दहशत निर्माण केली होती. त्याचा गुरूवार पेठेतील मित्र अनिल विठ्ठल मारणे त्याकाळचा मोठा गुन्हेगार. त्याच्याशी गणेशची मैत्री. त्याच्याकडून गणेशला गुन्हेगारीचे धडे मिळाल्याचे पोलिस सांगतात. गणेश मारणेला पुणे पोलिसांनी सर्वात प्रथम १९९३ मध्ये अटक केली होती. नंतर २००३ मध्ये एका मारहाणीच्या गुन्ह्यात देखील त्याला व त्याच्या मित्राला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
संदीप मोहळशी पहिला वाद
साधारण, २००३ चा सप्टेंबर महिना, गणेश मारणे त्याच्या काही साथीदारांसोबत दुपारी खिलारेवाडीत बसलेला होता. तेव्हा संदीप मोहोळ हा त्याच्या मित्रांसह गाडीतून जात होता. पण, गणेश मारणे याने संदीपला माझ्याकडे रागाने का पाहिले, असे म्हणून अडविले आणि वाद घातला. वादात गणेश मारणे व सचिन पोटे यांना डोक्याला दुखापत झाली. पण, कोणीही पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले देखील नाही. तेव्हांचा तो काळ. पण, खऱ्या अर्थाने या भांडणातून संदीप मोहोळ व गणेश मारणे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती.
मार्केटयार्डमधील हमाली कॉन्ट्रॅक्टवरून वाद
गणेश मारणेचा साथीदार व मित्र देखील. पण, तो संदीप मोहोळसोबत सलगी व संपर्क ठेवत असत. याचा गणेशच्या मनात राग होता. दरम्यान, अनिल मारणे आणि बाबा बोडके टोळीत मार्केटयार्डमधील हमाली कॉन्ट्रॅक्टवरून सतत वादविवाद होत होते. तेव्हा गणेश मारणे व माऊली जावळकर हे मार्केटयार्डमध्ये काम करत होते. ते मित्र होते, पण दोघेही वेगवेगळ्या टोळ्यांशी कनेक्ट होते. गणेश हा अनिल मारणे आणि जवळकर हा बाबा बोडके टोळीशी सलग्न झाले होते. दोन्ही टोळीतील वर्चस्वातून जवळकर याच्या खूनाचा प्रयत्न झाला. यानंतर गणेश मारणे, सचिन पोटे व इतर कारागृहात होते. तेव्हा अनिल मारणे याने जवळकर याला केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता.
अनिल मारणेचा खून
अनिल मारणे तेव्हा मारणे टोळीचा प्रमुख होता. त्याची वाढलेली दहशत आणि त्रास तसेच संदीप मोहोळ याला गणेश मारणे याने केलेली मारहाण. जवळकर याच्यावरील हल्ला व त्याच्या खूनाचा प्रयत्न. यामुळे बाबा बोडके टोळीतील सदस्यांनी २००५ मध्ये अनिल मारणे याचा वानवडी परिसरात खून करण्यात आला. या खूनानंतर बोडके टोळीचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढले होते. याचा प्रचंड राग गणेश मारणे याच्या मनात होता.
संदीप मोहोळकडे टोळीची सूत्रे
अनिल मारणेच्या खूनाने मारणे टोळीचे सूत्रे गणेश मारणे याच्याकडे आली. तो कारागृहातून बाहेर आला. तर, अनिलच्या खून प्रकरणात बाबा बोडके कारागृहात होता. त्यामुळे बोडके टोळीचे सूत्रे संदीप मोहोळच्या हातात होती. तेव्हा अत्यंत मोठ्या स्पीडने गुन्हेगारी जगतात संदीप मोहोळचे नाव हे पुढे आले होते. त्याची दहशतही वाढली होती. तो पहिलावन होता. त्यामुळे त्याचा दरारा देखील होता. गुन्हेगारी जगतात त्याचे नाव आबदीने घेतले जात. डेरींगबाज म्हणून ओळखला जायचा, त्यातूनच त्याने गणेश मारणे, सचिन पोटे यांना त्यांच्या घराजवळ जाऊन मारहाण केली होती, ज्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली नव्हती. दुसरीकडे संदीप व गणेश दोघे मुळशी तालुक्यातील, पण, संदीपने गुन्हेगारी जगतासोबत मुळशीतही लक्ष घातले. त्यामुळे गणेशचे गावाकडचे वर्चस्व कमी झाले. संदीप मोहोळ मुठा गावचा, तेव्हा भावकीतील विठ्ठल मोहोळ मुठा गावचे सरपंच होते. मात्र, संदीप मोहोळ त्यांना बाजूला करून बिनविरोध मुठा गावचा सरपंच देखील झाला. त्याची सल मात्र, विठ्ठल मोहोळ यांचा मुलगा पांडुरंग मोहोळ याच्या मनात होती. त्यातून पांडुरंग मोहोळ हा गणेश मारणे याला येऊन मिळाला. दुसरीकडे कर्वेनगर भागात केबलचा व्यवसाय करणाऱ्या समीर व जमीर शेख या भावडांना मारहाण करून संदीप मोहोळने त्यांना जबरदस्तीने उचलून देखील नेले होते. संदीप मोहोळचा वाढलेला हा हौदोस मात्र त्याला घातक ठरला आणि गणेश मारणेच्या पथ्यावर पडला.
संदीप मोहोळच्या खूनाचा थरार
गणेश मारणेवर झालेला हल्ला, अनिल मारणेचा खून, शेख भावंडाना मारहाण तसेच मुळशीतील वर्चस्व आणि गुन्हेगारीत संदीप मोहोळचा वाढलेला दबदबा यामुळे गणेश मारणे अत्यंत बेचैन होता. त्याने संदीप मोहोळवर नाराज असलेले आणि दुखावलेले लोक एकत्रित केले. त्यांच्याकडून संदीप मोहोळबाबत माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. २००६ मध्ये गणेश मारणे याने अत्यंत नियोजन पद्धतीने संदीप मोहोळ याच्यावर लक्ष ठेवून त्याचा टोळीच्या मदतीने थरारकरित्या पौड फाटा परिसरात गोळ्या झाडून आणि कोयते, चॉपर व इतर शस्त्राने हल्ला करून खून केला. संदीप मोहोळ जेव्हा गावातून कोथरूडच्या दिशेने निघाला, तिथपासून संदीप मोहोळचे लोकेशन व तो कुठपर्यंत आला, यासाठी ठिकठिकाणी मुले ठेवली होती. गाडी सिग्नलला थांबताच टोळीने हल्ला केला होता. सचिन पोटे याने पिस्तूलातून गोळ्या झाडल्या होत्या, तर इतरांनी त्याराने हल्ला केला होता.
किशोर मारणेचा खून संदिपच्या खूनाचा बदला
संदीप मोहोळच्या खूनाने बोडके टोळी पुर्ण हादरून गेली होती. तर गणेश मारणेसह इतर कारागृहात गेले होते. मारणे टोळी पुढे किशोर मारणे चालवू लागला. पण, मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी संदीपचा भाऊबंद व घटनेच्या वेळी त्याच्या गाडीचा चालक असलेल्या शरद मोहोळ याने प्रयत्न सुरू केले. दुसरीकडे संदीपच्या हत्याने मारणे टोळीची दहशत मुळशी ते पुणे अशा सर्व बाजूने प्रचंडरित्या वाढली होती. किशोर मारणे मोहोळच्या मुलांना त्रास देत होता. हा त्रास दिवसेंदिवस वाढत जात होता. त्यातूनच शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांनी किशोर मारणे याचा दत्तवाडी परिसरात खून केला आणि संदीपच्या खूनाचा बदला घेतला.
किशोर मारणेच्या खूनाचा बदला
संदीप मोहोळच्या खूनाचा बदला म्हणून मारणे टोळीचा तेव्हाचा प्रमुख किशोर मारणेचा शरद मोहोळ व त्याच्या टोळीने खून केला. संदीप मोहोळच्या खूनात गणेश मारणे व टोळी कारागृहात होती. तरीही गणेश मारणेसाठी बरीच मुले काम करत होती. त्यातूनच मुळशीत आणखी ताकद वाढविण्यासाठी व वर्चस्व वाढविण्यासाठी आणि किशोर मारणेच्या खूनाचा बदला म्हणून मारणे टोळीने संजय उर्फ पिंट्या सदाशिव मारणे याचा उरावडे फाटा परिसरात खून केला. पिंट्या मारणे हा गजानन मारणे याचा मित्र होता. त्याने शरद मोहोळला किशोर मारणेच्या खूनात मदत केल्याचा संशय देखील मारणे टोळीला होता.
संदीप मोहोळची गँग पुढे शरद मोहोळने चालविली. तो कारागृहातून बाहेर आला. पण, सामाजिक कार्य सुरू करून एक पाऊल राजकारणात देखील टाकले होते. गुन्हेगारीपासून लांब झालेला शरद मोहोळ समाजकार्यात होता. पण, दुसरीकडे शरद मोहोळच्या गावातील ग्रामपंचायतीच्या राजकारणात नामदेव कानगुडे याला शरद मोहोळने मारहाण केली होती व पाया देखील पडायला लावले होते. त्याचा राग भाजा मुन्ना उर्फ साहिल पोळेकरला होता. तरीही तो शरद मोहोळसोबत राहू लागला. त्याने शरद मोहोळसोबत राहत हालचालींवर लक्ष ठेवले. जानेवारी २०२४ मध्ये शरद मोहोळचा मुन्ना पोळेकर व नामदेव कानगुडे, अमित कानगुडे व इतरांनी खून केला. या खूनाच्या तपासात नंतर गणेश मारणे, विठ्ठल शेलार हे देखील सहभागी असल्याचे समोर आले. त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. सध्या हे कारागृहात आहेत.