
पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील 'या' परिसरात सापळा रचून पकडले
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई एनडीए रस्त्यावर करण्यात आली आहे. सराइताकडून पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त केली आहेत.
गणेश सतीश रणखांब (वय २५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव राऊत, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व त्यांच्या पथकाने केली आहे.
रणखांब हा भाजी विक्रेता आहे. कोथरूड परिसरात त्याने २०१३ मध्ये एकाचा खून केला होता. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. डेक्कन जिमखाना भागातील चौपाटी परिसरात एका हॅाटेल व्यावसायिकाला मारहाण केल्याप्रकरणी रणखांब याच्यासह तिघांना अटक करण्यात आली होती. रणखांब एनडीए ते खडकवासला रस्त्यावर थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिस हवालदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून रणखांब याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. रणखांब याने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने पिस्तूल कोणाकडून आणले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.