सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार
पुणे : शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार तरुण मंडळी यांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन मृत्यूचं प्रमाणदेखील जास्त आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या मध्यभागात मध्यरात्री क्रमांक नसलेली दुचाकी घेऊन अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पावणे दोन लाखांचे मेफेड्रॉनसह ३ लाखांचा माल जप्त केला आहे.
कानिफनाथ विष्णु नायडु (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे या सराईताचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार आशिष अधिनाथ चव्हाण यांनी खडक पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
कानिफनाथ नायडु सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील अमली पदार्थ तस्कारांवर नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अलका जाधव व त्यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते पंडीत जवाहरलाल नेहरु रोडने टिंबर मार्के येथील बाहुबली चौकात आले. तेथून काशेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर एक नंबर प्लेट नसलेल्या सुझुकी बर्गमॅन मोपेड दुचाकीवर एक जण आंधारात थांबलेला दिसून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला पकडले.
कानिफनाथ नायडु याची झडती घेतली असता त्याच्या खिशातील पिशव्यांमध्ये मॅफेड्रॉन (एमडी) ची ८ ग्रॅम ५७ मिलीग्रॅम पावडर आढळून आली. १ लाख ७२ हजार ४०० रुपयांचे एमडी, अंमली पदार्थ विकून आलेले २५ हजार ७०० रुपये, दुचाकी, मोबाईल असा ३ लाख १३ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे अधिक तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : पर्वतीत दोन तरुणांवर टोळक्यांकडून हल्ला, कारणही आलं समोर
स्वारगेट बस स्थानकासमोर गांजा तस्कराला पकडले
गेल्या काही दिवसाखाली स्वारगेट बस स्थानकात पोलिसांनी एका गांजा तस्काराला पाठलाग करून थरारकरित्या बेड्या ठोकल्या. त्याच्यानंतर त्याचे दोन साथीदार देखील पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांच्याकडून ६ किलो गांजा, एक इनोव्हा क्रिस्टा कार तसेच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. नितीन नरसिंह पाल (वय २३, रा. वेळापुर, जि. सोलापूर), अल्ताफ ईलाई तांबोळी (वय २८) व विठ्ठल उर्फ दादा हरी शिवपाल (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, उपनिरीक्षक सुर्यकांत सतपाळे, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, नवनाथ शिंदे व त्यांच्या पथकाने केली.