संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून, खून, मारामाऱ्या, दरोडे, अपहरण अशा घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोेर आली आहे. पर्वती परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांवर टोळक्यांकडून धारदार व लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. किरकोळ कारणांवरून टोळक्याने दादागिरी करत मारहाण केली आहे. यामुळे सहकारनगर तसेच दत्तवाडी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
पहिली घटना ७ जुलैला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी येथील मांगिरबाबा चौकात घडली आहे. येथे आदित्य वाघमारे (वय १८, रा. सिंहगड रोड) या तरुणावर चार जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला आहे. यश मेरवाडे, सौरभ साठे, प्रतिक जाधव आणि मनोज भोसले (सर्व रा. दत्तवाडी) यांनी विनाकारण शिवीगाळ करत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एका आरोपीने लोखंडी सळ्याच्या उलट्या बाजूने त्याच्यावर हल्ला केला. आदित्यने सळा पकडण्याचा प्रयत्न केला असताना त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी हत्यार हवेत फिरवत ‘कोण मध्ये येतो ते बघतोच’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली.
दुसरी घटना सहकारनगरमध्ये ८ जुलैला दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान सहकारनगर दोनमधील ओम मेडिकलसमोर घडली आहे. तळजाई वसाहतीतील अल्पवयीन मुलावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हल्ला केला आहे. ‘आमच्याकडे काय पाहत होता?’ असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करत त्याला व त्याच्या मित्रास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर एका तरुणाने धारदार हत्याराने अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर व छातीच्या डाव्या बाजूस वार केले.
दरम्यान, भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी धारदार हत्यारांचा वापर करून मारहाण करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. काही आरोपींची ओळख पटलेली असून, उर्वरितांचा शोध सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात भरदिवसा घरफोड्या; 3 फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरला
पुण्यात टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण
वैमनस्यातून टोळक्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना हडपसरमधील शिंदे वस्तीत घडली आहे. याप्रकरणी टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी टोळक्यावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काकासाहेब शिरोळे (वय ४६, रा. कसबा पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेश बागुल याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोळे यांनी याबाबत हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे.