गुन्हे शाखेच्या युनिट 6 ची मोठी कारवाई; घरफोड्या करणार्या दोघांना ठोकल्या बेड्या
पुणे : पुणे शहरात कोंढवा, लोणी काळभोर तसेच हडपसर परिसरात घरफोड्या करणार्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना पिस्तुलांसह गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. युनिट सहाच्या पथकाने त्यांना पकडून चार घरफोडीचे गुन्हे उघड केले आहेत. या दोघांकडून १२ लाख १७ हजारांचा मद्देमाल जप्त केला आहे. समीर उर्फ कमांडेा हनीफ शेख (वय १९, रा. सय्यदनगर, हडपसर, गंगानगर, फुरसुंगी) आणि यश मुकेश शेलार (वय २०, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, कानिफनाथ कारखेले, समीर पिलाने व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या घटना वाढतच आहेत. बंद फ्लॅट हेरून चोरटे घरफोड्या करून लाखोंवर डल्ला मारत आहेत. यापार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना या चोरट्यांचा माग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. यादरम्यान, चार दिवसांपासून या भागातील चोरट्यांचा माग युनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण व त्यांचे सहकारी काढत होते. तेव्हा पोलस ठाण्याच्या हद्दीत पोलिस हवालदार नितीन मुंढे गस्त घालत असताना त्यांना सराईत आरोपी समीन शेख याच्याकडे दोन पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले असता त्याच्याकडून पिस्तुले जप्त करण्यात आली. त्याच्याकडील अधिक तपासात त्याला काडतुसे व पिस्तुल हे यश शेलारने पुरविल्याचे निष्पन्न झाले. दोघांकडून एक, एक पिस्तुल जप्त करण्यात आले. पुढील तपसासाठी त्यांना पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरांची हिंमत वाढली; ज्येष्ठाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
कारची काच फोडून चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.