पुणे पोलिसांची मोठी कारवाई; चोरी करुन पळून गेलेल्या चोरट्याला पकडले
पुणे : चोरी केल्यानंतर पळून गेलेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी चार महिन्यांनी जेरबंद केले आहे. तेव्हा त्याने चोरलेले पैसे बँक खात्यात ठेवले अन् त्यातले काही पैसे खर्च देखील केले. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी ७ लाख २० हजार रुपये बँकेत गोठवले. तसेच एक लाख रुपयांचा आय फोन जप्त करण्यात आला आहे. डेबज्योती करुणामय डे (वय २८, रा. खरागुण, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. डेबज्योती डे याने एका घरात शिरुन ७ लाख २० हजार रुपये व आय फोन चोरी केला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले. तसेच चोरलेली सर्व रक्कम जप्त केली आहे.
पोलीसांकडून शहरातील पाहिजे व फरार आरोपींवर पाळत ठेलली जात आहे. नव्या वर्षाच्या १५ दिवसात २०२३ व २०२४ मधील ७ गुन्ह्यांची उकल केली आहे. २०२३ मध्ये जबरी चोरी करुन फरार असलेला उसामा शफिक शेख (वय २३, रा. सैय्यदनगर, हडपसर) याला अटक करुन हिसकावुन नेलेला ४५ हजार रुपयांचा मोबाईल केला आहे. २०२३ मध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ५ लाख रुपयांची फसवणूक करणार्या आशिष रामदास मानकर (वय ४८, रा. वाघोली) याला अटक केली.
वस्तू खरेदी करताना पाच हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही रक्कम बँकेस गोठविण्यास सांगून ती फिर्यादीला बँकेकडून परत करण्यात आली आहे. तसेच अर्जदाराची ऑनलाईन फसवणूक झाली होती. त्याबाबत त्वरील संबंधित बँकांना पत्रव्यवहार करुन अर्जदाराचे २८ हजार रुपये परत मिळवून दिले. शिवाजीनगर परिसरात हरविलेले मोबाईल तांत्रिक विश्लेषण करुन एकूण १० मोबाईल व १ लॅपटॉप परत मिळवून दिले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, पोलीस अंमलदार नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, अर्जुन कढाळकर, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात कारची काच फोडून चोरी; तब्बल साडेदहा लाखांची रोकड लंपास
औंध भागात घरफोडी
औंध भागातील सानेवाडी ओझन मॉल परिसरातील एका सोसायटीतल बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ७५ वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील रोकड व दागिने असा ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरला.