संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक रवींद्र ढावरे करत आहेत. हडपसर भागात दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड, दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली होती.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! वारजे भागात तरुणावर कोयत्याने हल्ला, सपासप वार केले अन्…
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
औंध भागात घरफोडी
औंध भागातील सानेवाडी ओझन मॉल परिसरातील एका सोसायटीतल बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ७५ वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील रोकड व दागिने असा ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरला.