पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर
पुणे : हडपसर भागात सुरू असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी चालक व मालक यांच्यासह २९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी येथून २९ लॅपटॉप, २० संगणक, ४१ मोबाइल, राऊटर, अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी निर्मल अजय शहा (वय ३८, रा. हडपसर), अतुल प्रविणभाई श्रीमाळी (वय ३०, रा. मगरपट्टा) व युगंधर संजय हादगे (वय ३४, रा. मांजरी बुद्रुक) यांच्यासह २९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पतंगे, सहायक निरीक्षक अमोल रसाळ व त्यांच्या पथकाने केली आहे.
हडपसरमधील मगरपट्टा रोडवरील एका प्रसिद्ध मॉल शेजारील मार्वल फिगो बिल्डींगमध्ये चौथ्या मजल्यावर हे बेकायदा व बोगस कॉल सेंटर चालविले जात होते. कॉल सेंटरमध्ये जवळपास २९ कामगार काम करत होते. ते अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या मोबाइलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेत होते. बँक खाते, तसेच डेबीट कार्डची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक केली जात होती. याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कॉल सेंटरवर छापा टाकला.
अशी होत होती फसवणूक
कॉल सेंटरमधून मोबाईल, लॅपटॉपवर मालवेअर (पॉपअप) व्हायरस टाकण्यात येत होता. नंतर त्यांना कॉल करून या मालवेअरबाबत सांगत, तुमच्या मोबाईल तसेच लॅपटॉप तसेच बँक खात्याची माहिती चोरीला जाण्याची भिती दाखवत होते. नंतर हे दुरूस्त करण्यासाठी त्यांना अॅन्टीव्हायरस, प्रोटेक्शन अॅप तसेच सेटींग सांगत त्यांच्याकडून याबदल्यात क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) स्वरूपात त्यांच्या ट्रस्ट वॉलेटद्वारे स्विकारून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती.