वाहन चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात; गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथकाची कारवाई
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने वाहन चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणले असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस अंमलदार अमित गद्रे, साईकुमार कारके, प्रदीप राठोड, इरफान पठाण, मनिषा पुकाळे यांनी केली.
पुणे शहरात वाहन चोरीच्या घटनांत वाढ झालेली आहे. या घटना कशा रोखणार असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे वाहन चोरांना व त्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणी व गुन्हे शाखेच्या पथकांना पेट्रोलिंग व गस्त घालत ते गुन्हे उघड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक तीन मार्चला गस्तीवर असताना, एका अल्पवयीन मुलाबाबतची माहिती पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानूसार, माहितीची खातरजमा करण्यात आली. नंतर पथकाने माहितीनुसार सापळा लावून या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान त्यानंतर केलेल्या सखोल तपास आणि मुलाच्या घरझडतीत चोरीच्या एकूण ८ दुचाकी सापडल्या आहेत. त्याने या दुचाकी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि पर्वती व वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक दुचाकी चोरली आहे. त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी करत आहेत.
हे सुद्धा वाचा : स्वारगेट अत्याचारप्रकरणी मोठी माहिती समोर; आरोपी- पीडितेची ओळख…
१४ दुचाकीसह एक सायकल जप्त
फरासखाना पोलीस, तसेच गुन्हे शाखेच्या दराेडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने गेल्या काही दिवसाखाली मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून १४ दुचाकीसह एक सायकल जप्त केली आहे. पुणे शहराच्या मध्यभागातून दुचाकी चाेरणारा आकाश हेरु कुंचन (वय २६, रा. बाटा गल्ली, बुधवार पेठ) याला अटक करण्यात अली आहे. आराेपी आकाशने फरासखाना पोलीस ठाणे, तसेच ग्रामीण परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.