संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : स्वारगेट सारख्या चौकात अन् नागरिकांची गर्दी असलेल्या बसस्थानकात पहाटेच्या वेळी तरुणीला धमकावत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणात त्या आरोपीचे व पिडीतीची ओळख नव्हतीच. त्यांच्यात कधीही फोन कॉल्स झालेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. साधारण पोलिसांनी दीड ते एक वर्षाचे कॉल्स चेक केले असून, त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. धक्कादायक म्हणजे, असा याप्रकरणावरच संशय निर्माण करून एकप्रकारे त्या आरोपीला मदत केली जात असल्याची चर्चा शहर पोलीस दलात आहे. वकील, राजकीय आणि माध्यमातून मुलीच्या कॅरेक्टरवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते.
स्वारगेट बसस्थानकात (दि. २५ फेब्रुवारी) २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. नराधम दत्तात्रय गाडेला पोलिसांनी तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर गुरूवारी मध्यरात्री गुनाट या गावातून अटक केली. अत्याचाराच्या या घटनेने पुण्यासह राज्यभरात खळबळ उडाली. बसस्थानकातच महिला, मुली सुरक्षित नसतील तर? असा प्रश्न उपस्थित करून सरकार व पुणे पोलिसांकडे बोट दाखविले जाऊ लागले. पुण्यातील कायदा- सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र देखील यामुळे पुन्हा प्रकार्षाने जाणवू लागले होते. मात्र, गेल्या एका दिवसात या प्रकरणावरच संशय व्यक्त होत एक नॅरेटिव्ह सेट करत तरुणीच्या चारित्र्यावरच एक प्रकारे संशय निर्माण करण्यात येत आहे. त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनीच बाहेर काढली. परंतु, आरोपीच्या वकिलानेच आम्ही असे कधी म्हणलो नाही आणि त्याबाबत आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके याप्रकरणात काय सुरू आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यासोबतच आरोपीसोबत पुर्वीपासून तरुणी संपर्कात होती, त्यांच्यात कॉल झालेत, ओळख होती, अशीही चर्चा सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात पोलिसांच्या कॉल डिटेल्समध्ये असे कुठेही आढळून आलेले नाही. दीड वर्षांच्या कॉल्सची हिस्ट्री पोलिसांनी तपासली असून, त्यातून हे स्पष्ट झाले आहे. तर, त्यांची ओळखही नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
संशय व सत्यता…
घटनेनंतरही ते एकत्र भेटले
स्वारगेटमधील घटनेनंतर पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात भेट झाल्याचे बोलले गेले. मात्र त्या दोघांत नंतर कोणतीही भेट झालेली नाही. किंवा फोन्स झालेले नाहीत. तरुणीचे लोकेशन व आरोपीचे लोकेशन एकाच भागात असले तरी वेगवेगळ्या ठिकाणचे आहे. तरुणी गाडीत बसल्यापासून जवळपास अर्धा ते पाऊन तास फोनवर त्याच्या मित्राशी बोलत होती. मित्राच्या सल्यानंतर ती बसमधून उतरली आणि पीएमपीने स्वारगेटला आली. थेट पोलीस ठाण्यात गेली.
जखमा, हत्या किंवा घृणास्पद म्हणजेच अत्याचार का ?
स्वारगेटमधील प्रकरणात मुलीला जखमा, किंवा तिचे कपडे फाटले का, अशा डोक ठिकाणावर नसलेल्यांकडून सोशल मिडीयात प्रश्न निर्माण केले जात आहेत. मात्र, घृणास्पद, हत्या, प्रचंड वेदना देऊन चेहरा विद्रुप करणे, जखमा होणे, असेच केले असेल तरच अत्याचार का असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. कपडे फाटले नाही आणि जखमा नाही म्हणून स्वारगेटमधील अत्याचार नाही का ?, त्या तरुणीची मानसिकता प्रचंड खचलेली आहे. ती आत्महत्येच्या विचारात असल्याचे तिच्या वकिलांनी म्हंटले आहे. त्यातही अशा चर्चा व माध्यमांमधील बातम्यांमुळे आणखीनच खचून गेली. तरुणीने आरडाओरडा केला, पण तिचा आवाज बाहेर आला नाही. नंतर आरोपीने तिला गळा दाबून मारण्याची धमकी दिली. मी खरचं मारेल असेही तो बोलला. तरुणी नोकरदार आहे. तिला घटनांबाबत माहिती आहे. त्यामुळे ती थेट भितीचे छायेत गेली अन् मला मारू नका, तुम्ही काही करा असे म्हणाल्याची माहिती सूत्रांची आहे.