तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर...; तरुणीला धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘तू माझ्याशी लग्न केले नाहीस, तर तुझे लग्न होऊ देणार नाही. फोटो व्हायरल करेन, करंट लावून जीव देईन’ अशा धमक्या देत तरुणाने १९ वर्षीय तरुणीचा मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी तरुणीने वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मे २०२४ पासून पीडित तरुणी आणि आरोपी तरुण एकमेकांच्या ओळखीचे होते. तरुणाने लग्नासाठी तिला विचारले होते. मात्र, तिने लग्नास नकार दिला. नंतर तरुणाने तिचा पाठलाग सुरू केला. तिने नकार दिल्यानंतर त्याने सतत लग्नासाठी दबाव आणला. १५ एप्रिल २०२५ रोजी आरोपीने ‘तू लग्न केले नाहीस तर विष पिऊन किंवा करंट लावून आत्महत्या करीन’ अशी धमकी दिल्यानंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. तसेच, ‘तू माझ्याशी लग्न न केल्यास, तुझे फोटो फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकेन’ असे बोलून त्याने तिची बदनामी करण्याची धमकी दिली. पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार
गेल्या काही दिवसाखाली दुकानात निघालेल्या साडेअकरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बलात्काराची घटना उत्तमनगर येथील एका लॉजवर घडली आहे. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉजच्या मालकासह व्यवस्थावकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी राहुल विनोदकुमार गौतम (वय २४, रा. अमरभारत सोसायटी, वारजे), अविनाश अशोक डोमपल्ले (वय २४, रा. वारजे), पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे, तसेच लॉज व्यवस्थपक टिकाराम चपाघई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.