
हडपसरच्या टिपू पठाण टोळीला दणका; पुणे पोलिसांनी केली 'ही' मोठी कारवाई
पठाण आणि साथीदारांनी हडपसरमधील सय्यदनगर भागात असलेल्या जागेचा बेकायदा ताबा घेऊन तेथे पत्र्याचे शेड उभे केले. ही जागा एकाला भाडेतत्त्वावर वापरण्यास दिली. ही बाब तक्रारदाराच्या लक्षात आल्यानंतर त्याने पठाणसह साथीदारांना जागेवरचा ताबा सोडण्यास सांगितले. तेव्हा जागा मोकळी करुन देण्यासाठी पठाणने २५ लाख रुपये खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
पठाण आणि साथीदारांनी संघटित गुन्हेगारी करुन दहशत माजविली. त्यांच्यावर मकोका कारवाईचा प्रस्ताव काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे पाठविला. या प्रस्तावाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीं मंजुरी दिली.
हडपसरमधील सय्यदनगर परिसरात पठाण याची दहशत आहे. त्याच्यावर वानवडी, हडपसर, काळेपडळ पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. पठाणने यापूर्वी एका महिलेला धमकावून तिच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतला होता. पठाणने कार्यक्रमात नोटाही उधळल्या होत्या. पठाण याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र, पोलिसांनी पठाण याच्यासह १६ साथीदारांवर मोक्कानुसार कारवाई केल्यानंतर अनेकजन त्याच्याविरोधात तक्रार देण्यास पुढे येत असल्याचे सांगण्यात आले.
एकाचा पोलिस चकमकीत एन्काऊंटर
पठाण टोळीतील पसार साथीदारांचा पुणे पोलिस शोध घेत होते. यादरम्यान, शाहरूक उर्फ हट्टी हा मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिस त्याला पकडण्यासाठी त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेले होते. त्याठिकाणी त्याची पोलिसांशी चकमक उडाली होती. या चकमकीत त्याचा एनकाऊंटर झाला होता.
पठाणसह साथीदारांची बँक खाती नुकतीच गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठाणसह साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. कारवाईत पठाणचे कार्यालय तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकले होते.