बापरे! दुचाकीवरून दोघेजण आले अन् पुढे जे घडलं…; पुण्यातील धक्कादायक प्रकाराचा पोलिसांनी लावला छडा
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून १ तोळे वजनाची सोन्याची चैन जप्त केली आहे. राजू महादेव डेंगळे (२२, रा. गोकुळनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
पुणे शहरात सोनसाखळी हिसकावणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जेष्ठ महिला व नागरिक या चोरट्यांचे टार्गेट असले तरी चान्स मिळताच हे चोरटे सोनसाखळी हिसकावत आहेत. ३० जानेवारी रोजी सकाळी संबंधीत महिला मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडल्या होत्या. या भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमुर्ती चौकातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन सराईतांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानूसार पोलीस त्याचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी हा कात्रज – कोंढवा रस्त्यावर असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याक्षणी सापळा रचून डेंगळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याची चैन जप्त करण्यात आली. त्याने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का याबाबत तपास सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण, कारणही आलं समोर; 5 जणांना अटक
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.