
MPSCच्या अभ्यासात जुळले सूर, PSI होण्यासाठी दिले 2.20 लाख, त्याच पतीने मागितले 40 लाख; प्रेमविवाहाची धक्कादायक कहाणी!
पुणे : MPSCच्या अभ्यासादरम्यान झालेली ओळख प्रेमात बदलली, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह झाला; मात्र पतीची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर पत्नीला हुंड्यासाठी त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४० लाख रुपये हुंडा, फ्लॅट आणि चारचाकी कारची मागणी करून मारहाण, शिवीगाळ तसेच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक राहुल शेषराव राठोड यांच्यासह दोघांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ३१ वर्षीय महिला असून, त्यांची राहुल राठोड यांच्याशी २०२२ ते २०२३ या कालावधीत शनिवार पेठेतील अभ्यासिकेत MPSCचा अभ्यास करताना ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. दोन्ही कुटुंबांनी लग्नाला संमती दिली. राहुलच्या PSI होण्याच्या प्रवासात फिर्यादीने त्याला मानसिक, आर्थिक आणि शारीरिक मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मैदानी चाचणीदरम्यान राहुलला मसल टीयर झाल्यानंतर उपचारासाठी फिर्यादीने २ लाख २० हजार रुपये दिल्याचा आरोप आहे.
राहुल राठोड याची १ ऑगस्ट २०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षकपदासाठी निवड झाली. त्यानंतर त्याच्या वागण्यात बदल झाल्याचा आरोप आहे. गावाकडे काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील डीजेच्या खर्चासाठी राहुलचा भाऊ रोशन राठोड याने फिर्यादीकडून २० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मिरवणुकीदरम्यान नातेवाईकांमध्ये फिर्यादी वेगळ्या जातीची असल्याबाबत चर्चा झाल्यानंतर राहुलने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गावी गेल्यानंतर त्याने फिर्यादीचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर २५ मे २०२५ रोजी फोन करून नाते संपल्याचे सांगत घरच्यांच्या पसंतीने लग्न करणार असल्याचे राहुलने सांगितले. तसेच हुंडा किती घ्यायचा हेही ठरल्याचे त्याने सांगितल्याचा आरोप आहे. दरम्यान, देवदर्शनासाठीही फिर्यादीकडून २० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी आणि लग्नाचे आश्वासन देत सुरुवातीला २५ लाख रुपये, त्यानंतर ४० लाख रुपये हुंड्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. राहुल नाशिक येथे प्रशिक्षणासाठी गेल्यानंतरही त्याचा संपर्क मर्यादित होता. त्याचे नातेवाईकही हुंड्याबाबत वारंवार विचारणा करत असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. महिला आयोग आणि भरोसा सेलमध्ये तक्रार केल्यानंतर अखेर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने १२ सप्टेंबर २०२५ रोजी आळंदी येथील मंगल कार्यालयात विवाह झाला.
विवाहानंतरही राहुलने पत्नीला सासरी नेले नाही आणि सणासुदीच्या काळातही योग्य वागणूक दिली नाही, असा आरोप आहे. जून २०२६मध्ये धनकवडीतील मोहननगर परिसरात दोघे एकत्र राहू लागल्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घराचे भाडे, डिपॉझिट आणि घरखर्च अर्धा-अर्धा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच ‘तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही’ असे म्हणत अपमान केला आणि चारचाकी कार आणण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
२९ ऑगस्ट २०२६ रोजी अन्य महिलेशी फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी राहुलने पत्नीला शस्त्र दाखवून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही दिवस त्या माहेरी गेल्या होत्या. १२ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन कामासाठी निघताना राहुलने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करून आरडाओरड केली. त्याने शेजाऱ्यांसमोर पत्नीविरोधात आरोप करत गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे आपण मानसिकदृष्ट्या खचल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल शेषराव राठोड आणि राजू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश खांडवे करीत आहेत.
Ans: प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक राहुल शेषराव राठोड यांच्यावर मुख्य आरोप आहे.
Ans: फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, राहुलला मैदानी चाचणीदरम्यान दुखापत झाल्यानंतर उपचारासाठी तिने २ लाख २० हजार रुपये दिले होते
Ans: सहकारनगर पोलिसांनी राहुल राठोड यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.