
मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ
पुणे : पुण्यात एका 31 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. उपचार सुरू असताना या तरुणाने आपल्या आई आणि बहिणीजवळ लोहगाव पोलिस ठाण्यात आपल्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक आरोप केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांच्या कथित मारहाणीमुळेच तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज देत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
आकाश देवदास घलोत (वय 31) असे मृत तरुणाचे नाव आहे. 8 ऑक्टोबर रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने आकाशला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना 9 ऑक्टोबर रोजी त्याने आपल्या आई आणि बहिणीला लोहगाव पोलिस ठाण्यात आपल्याला मारहाण झाल्याची माहिती दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर उपचार सुरू असतानाच आकाशचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने केलेल्या या कथित आरोपामुळे कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
हेही वाचा: Accident News: तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू
दरम्यान, पोलिसांनी कुटुंबीयांचे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. संबंधित तरुण पोलिसांच्या ताब्यात नव्हता, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. तसेच लोहगाव पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संपूर्ण चित्रीकरण नोंदवले गेले असून, पोलिसांनी आकाशला कोणत्याही प्रकारे मारहाण केलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सध्या या प्रकरणाची पोलिस आयुक्तांच्या स्तरावर चौकशी सुरू आहे. आकाशच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आणि त्याने केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, मृत्यूपूर्वी तरुणाने केलेल्या कथित आरोपामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.