
बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा सुळसुळाट, सटाण्यात ३० हजार रुपयांहून अधिक नोटा जप्त
पोलिसांच्या ताब्यात असलेले सर्व संशयित हे बागलाण तालुक्यातीलच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात असून, आरोपींकडून चौकशी करून मुळापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा निर्धार आहे.
सटाणा शहर व तालुक्यात किती दिवसांपासून बनावट नोटांचा व्यवहार सुरू होता, याचाही तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ५०० रुपयांच्या नोटांचा वापर झाल्याने त्या व्यवहारांवरही संशयाची सुई फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोपनीय तपासाला वेग देण्यात आला असून, लवकरच बनावट नोटा छापल्या जाणाऱ्या ठिकाणाचा शोध घेण्यात येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.या घटनेनंतर यात्रेतील व्यापारी, दुकानदार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक जण ५०० रुपयाच्या नोटा स्वीकारण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिक व यात्रेकरूंना ५०० रुपयांच्या नोटा देताना व घेताना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद नोट आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे सांगण्यात आले आहे.