संग्रहित फोटो
वृंदावन : संत प्रेमानंद महाराजांशी संबंधित गुरु कृपा कुंज परिसरात रसिक दुलारी शरण उर्फ दीपक लोधी या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. उपलब्ध वृत्तानुसार, तो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सर्वोदय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यात तो इमारतीवरून खाली पडताना दिसत असल्याचे वृत्त आहे.
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर आणि अन्य वस्तू आढळल्याचे सांगण्यात आले आहे. मृताच्या शरीरावरही जखमांच्या खुणा असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. शरीराच्या संवेदनशील भागाला झालेल्या दुखापतीबाबतही तपास सुरू आहे. या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून जप्त वस्तूंची तपासणी केली जात आहे.
सीसीटीव्हीमध्ये तो इमारतीवरून खाली पडताना दिसत असला, तरी त्यापूर्वी नेमके काय घडले, याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यामुळे सध्या मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगण्यात आलेले नाही. पोस्टमार्टम अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
रसिक दुलारीचे कुटुंब मथुरेत दाखल झाले असून त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कुटुंबीयांनी रसिकला भेटू दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या आरोपांचीही चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आश्रमातील त्याच्या वास्तव्याबाबत आणि घटनेपूर्वीच्या परिस्थितीबाबतही पोलिस माहिती घेत आहेत.
रसिक दुलारी शरण हा मूळचा मध्य प्रदेशातील जबलपूरचा रहिवासी होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी तो वृंदावनमध्ये आला आणि प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतल्यानंतर त्याचे नाव दीपक लोधीवरून रसिक दुलारी शरण असे झाले. त्याला विजेच्या कामाचा अनुभव असल्याने आश्रमाशी संबंधित सेवेत तो कार्यरत होता. काही महिन्यांपूर्वी त्याला गुरु कृपा कुंज परिसरात राहण्यासाठी खोली देण्यात आली होती.






