रत्नागिरी : हुंडाबळीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. वैष्णवी हगवणे सारख्या प्रकरणानंतर कायद्याला म्हणावा तसा धाक लोकांना राहिलेला दिसत नाही. अशाच एका घटनेने रत्नागिरीत खळबळ माजली आहे. दागिने आणि पैशांसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ तिच्या पतीकडून होत होता. पतीच्या जाचाला कंटाळून पिडितेने खाडीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी चिपळूण खाडीमध्ये आत्महत्या केलेल्या ४० वर्षीय विवाहितेला (सौ. अपेक्षा अमोल चव्हाण) सोन्याचे दागिने आणि पैशांसाठी वारंवार मानसिक छळ व्हायचा. पिडितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या दोन महिलांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मयत विवाहितेच्या आईने, सुनिता सखाराम गणवे (वय ६५, रा. कांदीवली, मुंबई, मूळ रा. शिवधामापूर, संगमेश्वर) यांनी दि. १६/१०/२०२५ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, एप्रिल २०२५ ते दि. २३/०९/२०२५ या कालावधीत हा छळ झाल्याचे म्हटले आहे.गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये १) अमोल शंकर चव्हाण (वय ४८ वर्षे, पती), २) ६७ वर्षीय एक महिला (सासू), आणि ३) दिवा येथील एक महिला (नणंद) यांचा समावेश आहे. हे तिघेही शिवधामापूर, ता. संगमेश्वर (आरोपी क्र. ३ वगळता) येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला अपेक्षा चव्हाणने तिच्या आईकडून एका कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने आणले होते. त्यापैकी काही दागिने तिच्या पतीने गहाण ठेवले होते. ते दागिने सोडवण्यासाठी पडितेच्या आईने पैसेही दिले होते. मात्र, यातील तिन्ही आरोपींनी संगनमत करून अपेक्षाच्या आईने दागिने आणि पैसे परत मागू नयेत, तसेच व्यवसायाकरिता माहेरहून पैसे घेऊन यावेत यासाठी मयत अपेक्षा चव्हाण यांना वारंवार तगादा लावून त्यांचा मानसिक छळ केला. या सततच्या त्रासाला कंटाळून मयत अपेक्षा यांनी दि. २३/०९/२०२५ रोजी चिपळूण खाडीमध्ये जाऊन आत्महत्या केली.संगमेश्वर पोलिसांनी या तक्रारीच्या आधारावर आरोपींविरुद्ध भारतीय संहिता कायद्याच्या कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) सह इतर कलमांखाली गुर.आर.क्र. १२०/२०२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची नोंद दि. १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे.