संग्रहित फोटो
आष्टी : राज्यासह दजेशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यात भरदिवसा घरफोड्या करून तब्बल ४७ तोळे सोने चोरून नेल्याच्या घटना घडल्या हाेत्या. सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून या टोळीतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीत भरदिवसा तीन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आष्टी तालुक्यातील कासारी येथील संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय २५) हा असल्याचे उघड झाले आहे. सांगली आणि बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला बीडमधून अटक केली आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीत भरदिवसा तीन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आष्टी तालुक्यातील कासारी येथील संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय २५) हा असल्याचे निष्पन्न झाले. सांगली पोलिसांच्या पथकाने १०० किलोमीटरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केली, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिलेने आरोपींना ओळखले आणि त्यांच्या दुचाकीच्या नंबरवरून आरोपींचा माग काढला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या (मोहन भोसला) दुसऱ्या आरोपीने घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ आष्टी तालुक्यात दाखल झाले.
कासारीतील पारधीवस्तीवर छापा
मंगळवारी (दि.१४) रात्री आष्टी पोलिसांची मदत घेऊन सांगली पोलिसांनी कासारी येथील पारधीवस्तीवर छापा टाकला. अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेल्या या कारवाईत संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले याला त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकण्यात आल्या. या टोळीतील तिसरा साथीदार अतुल नवनाथ भोसले हा अद्याप फरार आहे.
तीन घरफोड्यांत ४७ तोळे सोने चोरीला
तीन घरफोड्यांत तब्बल ४७ तोळे सोने चोरीला गेले होते. आष्टीचे पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांच्यासह प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. फरार आरोपीचा पोलिस शाेध घेत आहेत.