
पुण्यातील मुंढवा परिसरातील ४० एकर जमीन खरेदीप्रकरणात अमाडिया एंटरप्रायझेस एलएलपी या कंपनीवर राज्य नोंदणी विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. या कंपनीत दिग्विजय पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे भागीदार आहेत. विभागाने या कंपनीला २१ कोटींच्या स्टॅम्प ड्युटी तुटीबाबत नोटीस पाठवली असून, ती भरावी किंवा तुटीचे तपशीलवार स्पष्टीकरण द्यावे, अशी अंतिम मुदत सोमवारपर्यंत दिली आहे.
अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नोटीस फक्त स्टॅम्प ड्युटी तुटीवर केंद्रित आहे आणि जमीन व्यवहार रद्द करण्याशी तिचा कोणताही संबंध नाही. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ʻही रक्कम भूखंडाच्या अधिग्रहण किंवा रद्दबातल करण्याच्या प्रक्रियेसाठी नाही. आम्ही फक्त स्टॅम्प ड्युटीची कमतरता भरून काढण्याची मागणी करत आहोत.ʼ त्यांनी पुढे सांगितले की, विभागाकडून देण्यात आलेल्या नोटीसमध्ये कंपनीने तुटीचे स्पष्टीकरण द्यावे आणि जर त्यांचे उत्तर समाधानकारक नसेल तर वसुली आदेश काढला जाईल. तसेच, जर कंपनीने उत्तर देण्यास विलंब केला, तर झालेला विलंब हे कारण देऊन विभाग थेट आदेश काढू शकतो.
Parth Pawar Land Scam: अमेडिया कंपनीला 24 नोव्हेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत
मुंढवा येथील ४० एकर जमिनीबाबतचा वाद मागील काही दिवसांत वाढला आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या जमिनीच्या पूर्वीच्या मालकीविषयी आणि कागदपत्रांतील तफावत याविषयी तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील महत्त्वाची व्यक्ती शीतल तेजवानी यांची तब्बल सहा तास तपास करण्यात आली. पोलिसांच्या मते, तेजवानी यांनी जमिनीच्या पावर ऑफ अटर्नीपासून ते मालकीचे कागदपत्रांपर्यंत सर्व दस्तऐवज सादर केले आहेत, ज्यांची पडताळणी केली जात आहे.
२००६ पासून जमीन त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा त्यांनी केला आहेत. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या निवेदनांची जमिनीच्या कागदोपत्रीसोबत बारकाईने तुलना केली जाईल आणि कुठलाही पुरावा दुर्लक्षित ठेवला जाणार नाही. तपास सर्व कोनातून केला जाईल—जमिनीचा इतिहास, बदललेली मालकी, नोंदणीच्या वेळचे कागदपत्रे, सर्व व्यवहारातील पावर ऑफ अटर्नी आणि प्रत्येक हस्तांतरणाच्या तारखा यांची सखोल तपासणी होईल. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “आम्ही तेजवानी यांची सहा तास चौकशी केली आणि जमीन व्यवहाराशी संबंधित सर्व माहिती नोंदवली.”