
‘बेबी किडनॅपिंग’चा कट फसला, सांगली पोलिसांनी लावला बालकाच्या अपहरणाचा छडा
कुरूंदवाड : दिवाळीचा सण…लक्ष्मीपूजनाची रात्र. सगळीकडे उजळून निघालेले घरं, आनंदाचे वातावरण, आणि त्याच वेळी सांगलीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. राजस्थानातील कोटा जिल्ह्यातून आलेल्या फुगे विक्रेत्या गरीब कुटुंबातील एक वर्षाच्या निष्पाप बालकाचे अपहरण करून त्याची अडीच लाख रुपयांत विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सांगली पोलिसांनी केवळ ७२ तासांत हा गुन्हा उघडकीस आणत बालकाला सुखरूप आईच्या कुशीत परत दिले, मात्र या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार इम्तियाज पठाण व त्याची पत्नी वसीमा पठाण अजूनही पोलिसांना चकवा देत आहेत.
कोटा (राजस्थान) येथील विक्रम पुष्पचंद बागरी, पत्नी, मुलगी आणि एक वर्षाच्या मुलासह सांगलीतील विश्रामबाग चौकात फुगे विक्रीचा व्यवसाय करतात. २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बागरी कुटुंब आपले फुगे विक्रीचे काम आटोपून चौकातील निवाऱ्यात विसावले होते. रात्री एकच्या सुमारास आईच्या जवळ झोपलेल्या बालकाला काही अज्ञात व्यक्तींनी उचलून नेले. पहाटे बालक दिसेनासे झाल्याचे लक्षात आल्यानंतर बागरी कुटुंब हादरले. त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. यामुळे पोलिसांवर मोठा ताण निर्माण झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व विश्रामबाग पोलिसांचे पथक तात्काळ अलर्ट करण्यात आले.
गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज (वय ४३, रा. मिरज), इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण (रा. मिरज) या तिघांचा सहभाग असल्याचा सुगावा लागला. पोलिसांनी इनायत गोलंदाज याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने धक्कादायक कबुली दिली. त्यांनी बालकाला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावातील एका दांपत्याला बालक विकले होते. त्या दांपत्याला अपत्य नसल्याने ‘कायदेशीर प्रक्रियेद्वारे बाळ मिळवून देतो’ असे खोटे सांगून आरोपींनी विश्वास संपादन केला आणि सुमारे अडीच लाख रुपयांत सौदा ठरवला. त्यापैकी १ लाख ८० हजार रुपये आरोपींनी घेतले होते.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इम्तियाज पठाण आणि त्याची पत्नी वसीमा पठाण अद्याप फरार असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत. इम्तियाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो ठिकाणे बदलून पोलिसांना सतत चकवा देत आहे. पोलिसांनी त्याचा थरारक पाठलागही केला, मात्र तो पसार झाला. या तपासासाठी सांगली पोलिसांनी दिवाळीचा उत्सव बाजूला ठेवून रात्रंदिवस मेहनत घेतली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव आणि गुन्हे अन्वेषण पथकाने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता सर्वत्र कौतुकास्पद ठरली.
हरवलेले लेकरू पुन्हा आईच्या कुशीत
इनायतच्या कबुलीवरून सांगली पोलिसांनी सावर्डे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे तातडीने पोहोचून स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. सावर्डे येथील राजेशिर्के दांपत्याकडे ते बाळ सापडले. त्या क्षणी आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले, कारण तिचे हरवलेले लेकरू पुन्हा तिच्या कुशीत आले होते. पोलिसांनी बाळाची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले.
निष्पाप बालक पुन्हा आईच्या मांडीवर
राजस्थानातून येऊन फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या बागरी कुटुंबासाठी हे दिवस भयावह होते. मात्र सांगली पोलिसांच्या झटपट कारवाईमुळे त्यांचे लेकरू परत मिळाले. विक्रम बागरी व त्यांच्या पत्नीने अश्रूभरल्या डोळ्यांनी सांगली पोलिसांचे आभार मानले. सांगली पोलिसांनी दाखवलेली तत्परता, शिताफी आणि मानवतेची भावना ही खऱ्या अर्थाने दिवाळीच्या उजेडासारखीच समाजाला उजळवून गेली आहे. निष्पाप बालकाला पुन्हा आईच्या मांडीवर आणणाऱ्या या पोलिसांचे संपूर्ण समाजाकडून कौतुक होत आहे.
इम्तियाज पठाण हा या गुन्ह्याचा सुत्रधार आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत पकडण्यात येईल. आमची पथके त्याच्या मागावर असून लवकरच तो आमच्या ताब्यात येईल. -सुधीर भालेराव, पोलिस निरीक्षक, विश्रामबाग ठाणे