
अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर कारवाई
संगमेश्वर पोलिसांकडून तिघांवर गुन्हा दाखल
कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा
देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील करजुवे वातवाडी परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंडळ अधिकारी सागर अनंत करंबेळे (वय ४२, रा. देवरुख) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास सुरज नलावडे (रा. करजुवे) याने कापशी नदीतून बेकायदेशीररीत्या सुमारे २५ ब्रास, किंमत अंदाजे २.५० लाख रुपये किंमतीची वाळू उपसून ठेवली होती. त्यानंतर शकील अहमद (वय २४, रा. उत्तर प्रदेश) व राजकुमार प्रजापती (रा. चिपळूण) हे दोघेही घटनास्थळी येऊन एकमेकांच्या संगनमताने वाळूचे लोडिंग व वाहतूक करत असल्याचे पोलिसांना आढळले.
२५ ब्रास वाळू; प्रकरणी अधिकचा तपास सुरू
यावरून या तिघांवर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ३२ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात २५ ब्रास वाळू २. लाख ५० हजार, जेसीबी (MH०९/CL/०५०७) २० लाख रुपये आणि डंपर (MH०८/W/८७२४) १० लाख रुपये असे ३२ लाख ५० हजारांचा समावेश आहे.
वाळू उपशाबाबत उलट सुलट चर्चांना उधाण
माखजन पोलिस दुरक्षेत्राच्या नंबर ६२/२०२५ वरून वरिष्ठांच्या आदेशानुसार, हा गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई मपोहेकों के. आर. सावंत यांनी केली असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक व्ही. डी. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यात वाढत्या अवैध वाळू उत्खननाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून परिसरातील नागरिकांनी पोलिसाच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे. या कारवाईनंतर तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. हा अवैध वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता, अशा उलट सुलट चर्चाही या निमित्ताने पुढे येत आहे.
अर्धापूर पोलिसांकडून वाळूमाफियांविरुद्ध धडक कारवाई
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत सर्व पोस्टे प्रभारी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अर्धापूर पोलिसांनी मोठी मोहीम राबवत अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना नायब तहसिलदार राजेंद्र शिंदे यांनी मौजे पिंपळगाव पाटी येथील विश्वप्रयाग हटिलच्या मागील बाजूस रेतीने भरलेली वाहने उभी असल्याची माहिती दिली