Saswad Crime News: सासवड पोलिसांची धडक कारवाई; सायलेन्सरचा आवाज काढणाऱ्यांच्या पुंगळ्या केल्या टाईट
सासवड: वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, गाडीवर नंबर प्लेट दिसेल अशी लावावी, कर्णकर्कश हॉर्न तसेच गाड्याच्या पुंगळ्या काढून सायलेन्सरचे मोठ्याने आवाज करून गाड्या जोरात पळवू नये. तसेच दुचाकीवर ट्रिपल सिट नेवू नये, असे वारंवार आवाहन करूनही त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून वाहतूक नियमन आणि पोलिसांना आव्हान देणाऱ्या टवाळांना सासवड पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. गाड्यांच्या पुंगळ्या काढून सायलेन्सरचा आवाज काढणाऱ्या दुचाकीच्या सायलेन्सरवर अखेर रोडरोलर फिरवून भुगा करण्यात आला. त्यामुळे हिरोगिरी करणाऱ्याच्या पुंगळ्या चांगल्याच टाईट झाल्या आहेत.
सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उप निरीक्षक अर्जुन चोरगे, गणेश पाटील, सहायक फौजदार जयसिंग जाधव, पोलीस हवालदार लियाकत मुजावर, अभिजित कांबळे, वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार संतोष शिंदे, योगेश गरुड, पोलीस शिपाई तेजस शिवतारे, पोलीसमित्र वचकल, भुजबळ यांच्या पथकाने शनिवारी सकाळी जोरदार मोहीम राबवली.
हेही वाचा: Crime: दांडके अन् लोखंडी हत्याराने हॉटेल मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कारण वाचाल तर…
रत्यावर बेशिस्तपणे दुचाकी पळविणे, पुंगळ्या काढून सायलेन्सरचा फटाक्यासारखे मोठ्याने आवाज काढणे, दुचाकीवरून ट्रिपलसिट प्रवास करणे, नंबरप्लेट काढून वाहतुकीचे नियमन मोडणे अशा धोकादायक पद्धतीने वाहने चाविणाऱ्या दुचाकी बुलेट, स्प्लेंडर अशा १५ गाड्या चालकांसह ताब्यात घेवून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे बहुतेक सर्वजण अल्पवयीन आणि १२ वी मधील विद्यार्थी असल्याने त्यांना घरच्यांकडून वाहने का दिली जातात? असा प्रश्न पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी उपस्थित केला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांविरोधात अधिक कठोरपणे कारवाई करण्यात येणार आहे. ज्या गाड्या ताब्यात घेतल्या आहेत त्या गाड्या मुलांकडे न देता त्याच्या पालकांना बोलावून घेवून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतरच गाड्या देण्यात येतील. पालकांनी एक लक्षात घ्यावे, तुमच्या मुलाने कोणताही गुन्हा केल्यास त्याची शिक्षक पालकांना भोगावी लागणार आहे त्यामुळे आपल्या मुलांना वाईट संगतीपासून आणि चुकीच्या घटना घडण्यापूर्वीच रोखा.
ऋषिकेश अधिकारी , पोलीस निरीक्षक, सासवड
दांडके अन् लोखंडी हत्याराने हॉटेल मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे हॉटेल निसर्गचे मालक मालक अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांढेकर यांना सात जणांनी टिकावाच्या लाकडी दांडक्याने व लोखंडी हत्याराने जिवघेणा हल्ला करून हॉटेलचे नुकसान केले. तसेच काऊंटर मधून १८,३०० रुपये जबरदस्तीने काढुन घेवून फरार झाले. याबाबत सासवड पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. दरम्यान दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. परंतु त्यांचा हॉटेलवर दरोडा टाकण्याचा मुख्य उद्देश होता. मात्र त्यास विरोध झाल्यानेच मारहाण करून रक्कम लुटून नेली. अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.
हेही वाचा: Purandar Crime: पुरंदर तालुक्यात बेकायदा सावकारकी बोकाळली; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, थेट…
या घटनेत अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांडेकर जखमी झाले असून कैलास वांढेकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात अद्यापही उपचार सुरु आहेत. याप्रकरणी प्रेम उर्फ दत्ता राजु शेलार, अर्जुन महादेव शेलार, विशाल चव्हाण, शुभम जाधव सर्वजण( रा. भिवरी )तसेच भालचंद्र उर्फ गणेश शरद पवार( रा. म्हाडा कॉलनी सासवड, सर्वजण ता. पुरंदर )आणि दोन अल्पवयीनांसह एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपी लातूरला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांना मिळाल्यानंतर तपास पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने लातूर बसस्थानक येथे सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले.