हॉटेल मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न (फोटो- )
सासवड: पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे हॉटेल निसर्गचे मालक मालक अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांढेकर यांना सात जणांनी टिकावाच्या लाकडी दांडक्याने व लोखंडी हत्याराने जिवघेणा हल्ला करून हॉटेलचे नुकसान केले. तसेच काऊंटर मधून १८,३०० रुपये जबरदस्तीने काढुन घेवून फरार झाले. याबाबत सासवड पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. दरम्यान दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. परंतु त्यांचा हॉटेलवर दरोडा टाकण्याचा मुख्य उद्देश होता. मात्र त्यास विरोध झाल्यानेच मारहाण करून रक्कम लुटून नेली. अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.
या घटनेत अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांडेकर जखमी झाले असून कैलास वांढेकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात अद्यापही उपचार सुरु आहेत. याप्रकरणी प्रेम उर्फ दत्ता राजु शेलार, अर्जुन महादेव शेलार, विशाल चव्हाण, शुभम जाधव सर्वजण( रा. भिवरी )तसेच भालचंद्र उर्फ गणेश शरद पवार( रा. म्हाडा कॉलनी सासवड, सर्वजण ता. पुरंदर )आणि दोन अल्पवयीनांसह एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपी लातूरला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांना मिळाल्यानंतर तपास पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने लातूर बसस्थानक येथे सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले.
बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, डीबी पथकाचे पोलीस हवालदार जब्बार सयद, लियाकतअली मुजावर, सुरज नांगरे, पोलीस नाईक गणेश पोटे, पोलीस शिपाई तुषार लोंढे, नवनाथ नानवर, प्रणय मखरे, अक्षय चिले, महीला पोलीस शिपाई यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद करण्यात मोलाची कामगिरी केली. दरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडके, लोखंडी कोयते या वस्तू जप्त केल्या असून सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवस होवून देखील एकही आरोपी अटक करण्यात आला नव्हता. त्यामुळे भिवडी गावच्या ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करीत तब्बल ४०० ते ५०० ग्रामस्थांनी संपूर्ण सासवड बाजारपेठेतून मूकमोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध केला होता. तसेच तातडीने आरोपी अटक करावे अन्यथा आमच्या मार्गाने बंदोबस्त करण्यास आम्ही सक्षम आहोत असा जाहीर इशारा दिला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस पातळीवरून जोरदार घडामोडी घडल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना ताब्यात घेतले.