
शिक्रापूर पोलिसांनी माज उतरवला; गुंडांची त्यांच्या गावातूनच काढली धिंड
सणसवाडी येथील रोशन दरेकर यांच्या प्रगती इन्फ्रा कंपनीत जेसीबीचे काम सुरू असताना, रोशन हे कारने कंपनीत जात होते. त्यावेळी पिंटू दरेकर व विक्रम दरेकर यांनी त्यांची कार अडवली. दोघा भावांनी रोशनच्या कारची काच कोयत्याने फोडली आणि “प्रगती इन्फ्रा किंवा कोणत्याही कंपनीत पुन्हा काम केले, तर गोळ्या घालून मारून टाकू,”अशी धमकी दिली. यानंतर दोघांनी रोशनचा कोयत्याने खून करण्याचा प्रयत्न केला. रोशन प्रसंगावधानाने त्यांच्या तावडीतून सुटून पळून गेले. या प्रकरणी रोशन हिरामण दरेकर (वय २४ वर्षे, रा. डोंगरवस्ती, सणसवाडी) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांची धडक कारवाई, गावातून धिंड
पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, विजय मस्कर, जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहानू बांगर, हवालदार शिवाजी चीतारे, विकास पाटील, अमोल दांडगे यांच्या पथकाने आरोपी पिंटू दरेकर राहत असलेल्या भागातून दोघा भावांची हातात बेड्या घालून धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कृतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. आठवडाभरात पोलिसांनी अशा प्रकारे दुसरी धिंड काढल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याबाबत पोलिसांचा कडक पवित्रा स्पष्ट दिसत आहे.
पिंटू दरेकरवर दोन गंभीर गुन्हे दाखल
सणसवाडीतील आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून, तो तडीपारही झाला आहे. अलीकडील काळात पिंटू दरेकरवर दोन गंभीर गुन्हे दाखल झाले असून, सदर आरोपीबाबत तडीपारचा नवीन प्रस्ताव लवकरच पाठवणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.