
Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य
लखनऊ : रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी आणि मॉडेल श्रद्धा दुबे हिच्याबाबत पोलिस तपासात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हजरतगंज पोलिसांनी श्रद्धाच्या फ्लॅटची झडती घेतली असता तेथे शक्तिवर्धक औषधांचा साठा आढळून आला. तसेच, घटनेच्या दिवशी श्रद्धा आणि तिची बहीण रश्मी या दोघीही फ्लॅटमध्ये उपस्थित असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
पोलिस सूत्रांनुसार, शिवा शर्माच्या संशयास्पद मृत्यूनंतर श्रद्धा दुबे लखनऊमधून अयोध्येच्या दिशेने निघून गेल्याचा संशय आहे. हजरतगंज पोलिसांकडून टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. श्रद्धाचा शोध घेण्यासाठी दिल्लीपासून नेपाळपर्यंत विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. सध्या पाच संशयितांची चौकशी सुरू आहे. तपासात श्रद्धाचे यापूर्वी लग्न झाले असल्याची माहितीही समोर आली आहे. रायबरेली येथे पती प्रिंस दुबे याच्यासोबत राहत असलेली श्रद्धा सुमारे दहा वर्षांपूर्वी पतीला सोडून लखनऊला आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्याच्या महत्त्वाकांक्षेने तिने मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला आणि उच्चभ्रू वर्गातील लोकांमध्ये संपर्क वाढवला.
पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासला असता काही मोठे बिल्डर, राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींचे क्रमांक आढळल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासानुसार, श्रद्धा काही व्यक्तींशी जवळीक वाढवून त्यांच्याकडून पैसे उकळत होती का, तसेच खासगी व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करत होती का, याची पडताळणी सुरू आहे. मात्र हे सर्व आरोप अद्याप तपासाच्या टप्प्यात असून, त्याची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
९ ऑक्टोबरच्या रात्री २७ वर्षीय रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा यांचा लखनऊच्या हजरतगंज परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. शिवाची आई रंजना शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शिवा मागील काही महिन्यांपासून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रद्धा दुबे हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. श्रद्धा शिवाला ब्लॅकमेल करत होती, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती आणि तिच्यासोबत राहण्यासाठी दबाव टाकत होती, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. कुटुंबीयांनी शिवाला आधी डांबून अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर चौथ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आल्याचा आरोप केला आहे. शिवाच्या शरीरावर गंभीर जखमा, जबडा तुटल्याच्या खुणा आणि सिगारेटने भाजल्याच्या खुणा असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर श्रद्धा दुबे फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.