
सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
भद्रावती : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता भद्रावती शहरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटरसायकली चोरीला गेल्याच्या घटनांचा तपास करताना भद्रावती पोलिसांनी सुमारे ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रणाची पाहणी करून दोन संशयितांना नागपूर येथून शोधून काढले. आशुतोष यादव (वय १९) आणि कमल दास ( वय २०), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोटरसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांचा तपास पुढे सरकला आहे.
भद्रावती येथील आंबेडकरनगर निवासी विजय गायकवाड यांची होंडा कंपनीची लाल-काळ्या रंगाची मोटरसायकल (एमएच ३४ एसी २४१०) बसस्थानक परिसरातून चोरीला गेली होती. या मोटरसायकलची अंदाजे किंमत १० हजार रुपये असून, याप्रकरणी ४ सप्टेंबर २०२६ रोजी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. दुसऱ्या घटनेत, भद्रावती ते नागपूर मार्गावरील डोली पेट्रोलपंप परिसरातून जेना येथील अमोल बेलेकर यांची मोटरसायकल (एमएच ३४ सीडब्ल्यू २६२४) चोरीला गेली होती. या मोटरसायकलची अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये असून, याप्रकरणी ५ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. ही कारवाई भद्रावती पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक संतोष केदार, प्रशांत शेंदरे, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, अनुप आश्टुणकर, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड आणि मोनाली गारघाटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
हे सुद्धा वाचा : खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
सीसीटीव्ही फुटेजवरून चोरांचा काढला माग
पोलिसांनी दोन्ही घटनेत गुन्हा नोंदविला होता. दोन्ही घटनांचा गांभीर्याने तपास करताना भद्रावती पोलिसांनी चोरीच्या ठिकाणांपासून पुढील मार्गावरील सुमारे ७० सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. या चित्रणाच्या आधारे मोटारसायकल चोरांचा माग काढत पोलिस पथक नागपूरपर्यंत पोहोचले. तपासादरम्यान संशयितांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यात आला. या प्रकरणात आशुतोष अतीराम यादव (१९,) आणि कमल मोहन दास (२०,) यांना आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे.