
मुंबईत ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिकाची हत्या, तरुणाने डोक्यात घातला लोखंडी रॉड
घाटकोपरमधील फर्निचर लेन हा मृत्यूचा रस्ता बनला आहे. विक्रोळी पार्क साईट येथील रहिवासी सुरेंद्र धोंडू पचाडकर (महाराज) हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी फिरण्यासाठी घाटकोपरला आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते सीजीएस कॉलनीतील फर्निचर लेनमधून जात असताना त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून लोखंडी रॉड जप्त करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. अमन श्रीराम वर्मा (वय 19) असे सुरेंद्र पाचाडकर यांची हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अवघ्या पाच तासांमध्ये जेरबंद केले.
स्थानिक माहितीनुसार, घाटकोपरच्या बेस्ट रेड लाइट एरियापासून ध्रुवराज सिंग मार्ग, सीजीएस कॉलनी रोड, लक्ष्मी नारायण मंदिर रोड, उदय टॉकीज आणि सेंट्रल बारपर्यंतच्या रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक उपस्थित असतात. ड्रग्ज व्यसनी, पाकीटमार आणि चोरटे ये-जा करणाऱ्यांना लक्ष्य करतात. हे लोक प्रथम लोकांना ढकलतात, धक्का मारतात, नंतर त्यांच्याशी भांडतात आणि त्यांचे मोबाईल फोन आणि चेन हिसकावून पळ काढतात. जर त्यांना ते दिले नाहीत तर गटाने जमतात आणि मारहाण करतात. पचाडकर हे अशाच धोकादायक घटनेचा बळी ठरले.
घाटकोपरमधील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, रोकडिया हनुमान मंदिरापासून चांदणी लॉजपर्यंत, गैरकृत्यांमध्ये सहभागी असलेले पुरुष आणि महिला जाणान्या लोकांना जबरदस्तीने लुटताना दिसत आहेत. पोलिसांनी या ठिकाणी हाय-रेझोल्यूशन कॅमेरे बसवले आहेत, जे बहुतेकदा बंद असतात आणि काही कॅमेऱ्याऱ्यांची दिशा बदलण्यात आली आहे. सीजीएस कॉलनीमध्ये रस्त्याच्या कोला फर्निचर आणि भंगार विक्रेत्यांनी त्यांची दुकाने उभारली आहेत. जवळच सेंट्रल बेअरहाऊसिंगचे गोदाम आहे आणि रस्त्यांच्या कडेला झोपडपट्टया आहेत, गुन्हे केल्यानंतर समाजविघातक व्यक्ती या भागात जाऊन लपतात.