संग्रहित फोटो
पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाट्याजवळ टेम्पो मागे घेत असताना अवघ्या पावणेदोन वर्षांच्या चिमुकलीचा टेम्पोच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. रविवारी (१३ सप्टेंबर) सकाळी ‘ओंकार रोज नर्सरी’ परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. नर्सरीच्या मोकळ्या आवारात खेळत असलेल्या चिमुकलीला टेम्पोने धडक दिल्यानंतर ती मागील चाकाखाली आली. या घटनेने सोरतापवाडी आणि उरुळी कांचन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मूळचे मध्य प्रदेशातील असलेले स्वाकीद रमेश आदिवासी (वय २१) हे कुटुंबासह सोरतापवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांची पावणेदोन वर्षांची मुलगी रविवारी सकाळी नर्सरीच्या मोकळ्या आवारात खेळत होती. त्याचवेळी दिलीप रामचंद्र साहा (सध्या रा. सोरतापवाडी, मूळ रा. बिहार) हा टेम्पो घेऊन तेथे आला होता. काही कामानिमित्त टेम्पो मागे घेत असताना त्याचे मागील बाजूकडे पुरेसे लक्ष गेले नाही. टेम्पो मागे घेत असताना खेळत असलेली चिमुकली वाहनाच्या मागील बाजूस आली. चालकाला तिचा अंदाज न आल्याने टेम्पो पुढे सरकला आणि चिमुकली मागील चाकाखाली आली. चाक डोक्यावरून गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत चिमुकलीला पाहून कुटुंबीयांनी आरडाओरड केली. मात्र, तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे नर्सरी परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अवघ्या पावणेदोन वर्षांच्या मुलीचा डोळ्यांदेखत मृत्यू झाल्याने तिच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या प्रकरणी चिमुकलीचे वडील स्वाकीद रमेश आदिवासी यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पोचालक दिलीप रामचंद्र साहा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नर्सरी, वस्ती किंवा मोकळ्या जागांमध्ये वाहने मागे घेताना चालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेनंतर अधोरेखित झाले आहे. वाहनाच्या मागील बाजूस लहान मुले किंवा इतर व्यक्ती असल्याचे लक्षात न आल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे वाहन रिव्हर्स घेताना मागील बाजू प्रत्यक्ष पाहणे, शक्य असल्यास मदतनीसाची मदत घेणे आणि परिसर सुरक्षित असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. या घटनेचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.






