प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदेंचं मोठं पाऊल
ठाणे : ठाण्यातील मानपाडा परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे यांच्यावर पूर्णेकर कुटुंबीयांकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणीही केली जात आहे. अशातच आता मिनाक्षी शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. (Pradeep Purnekar Case)
प्रदीप पूर्णेकर यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय न्यायाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. राम पूर्णेकर यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी आंदोलन करत या प्रकरणातील संशयितांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आता मिनाक्षी शिंदे यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे.
विरोधी पक्षातील काही नेते या दुःखद घटनेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे ठाण्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
या पत्रातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मिनाक्षी शिंदे यांनी राम पूर्णेकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. राजकीय विरोधकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडवला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे राम पूर्णेकर, पूर्णेकर कुटुंबीय तसेच त्यांच्या निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पोलीस संरक्षणात तातडीने वाढ करावी, अशी विनंतीही पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
आपल्या पत्रात मिनाक्षी शिंदे यांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे यांच्यासह इतर विरोधी नेत्यांचा उल्लेख केला आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच, पत्रकार परिषदेत काही जामिनावर असलेले आरोपी उपस्थित असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
एकीकडे पूर्णेकर कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी सुरू आहे, तर दुसरीकडे मिनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणाला आता नवं राजकीय वळण मिळालं असून, पोलीस प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Pratap Sarnaik : सरनाईकांविरोधात भाजपचे आंदोलन; शिवसेना महिला आघाडीने आरसे दाखवत दिले प्रत्युत्तर!
Ans: मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून राम पूर्णेकर, त्यांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण वाढवून देण्याची मागणी केली आहे.
Ans: राम पूर्णेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह दिनेश पवार, अखिलेश पाल, प्रशांत मोटे, आनंद भोईर, किसान तट्टे आणि विवेक पांढरे यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
Ans: विरोधी पक्षातील नेते प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असून, चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे.






