कचऱ्याच्या हायवाने विद्यार्थ्याला चिरडल्याने जागीच मृत्यू, एक तास वाहतूक ठप्प (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मिल कॉर्नर ते लिटल फ्लॉवर स्कूल रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनी चौकातील बारापुल्ला गेट परिसरात बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात महानगरपालिकेच्या भरधाव कचरा वाहणाऱ्या गाडीने एका विद्यार्थ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ओमकार रायभान खनसे (२०, रा. सेंटर हौ.सो, बजाजनगर, एमआयडीसी वाळूज) असे मृत्यू विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.
ओमकार खनसे हा एसबी महाविद्यालयात बीबीएचे द्वितीय वर्षात शिकत होता. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास तो कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवर (एमएच-२०-एफडब्ल्यू-२००१) बारापुल्ला गेट परिसरातून जात असताना अचानक महापालिकेच्या भरवेगात आलेल्या कचरा नेणाऱ्या गाडीने (एमएच-२०-ईएल ००७९) त्याला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होत की, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. वाहतूक कोंडी आणि पोलिस कारवाई अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे मिल कॉर्नर ते छावणी या मार्गावर सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
हेदेखील वाचा : ३० वर्षीय अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू, घरी परतताना गाडी डिव्हायडरवर आदळली अन्…
ओमकारचे कुटुंब मूळचे पैठण येथील असून सध्या वाळूज येथे वास्तव्यास आहे. तो अभ्यासू आणि होतकरू विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
चालकाला घेतले ताब्यात, निष्काळजीपणाचा गुन्हा
भाऊ रोहित खनसे यांना विजय सरकटे यांनी फोन करून अपघाताची माहिती दिली. रोहित तात्काळ तेथे पोहोचले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ओमकारला तपासून दुपारी १२ वाजता मृत घोषित केले. प्रकरणात मृत ओमकारचा भाऊ रोहित खनसे (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
कचरा गाड्यांचा वाढतोय वेग
शहरात कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचा वाढता वेग आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. रहिवासी भागातही या गाड्या वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या गाड्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मनपा प्रशासनाने तातडीने वेगमर्यादा लागू करून कठोर नियंत्रण ठेवावे.






