crime (फोटो सौजन्य: social media)
अहमदाबाद/सुरत: गुजरातमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. सासऱ्याने त्याच्या सुनेच्या दारू पार्टीला वैतागून पोलिसांना छापा टाकण्यासाठी माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये धाड टाकली. तेव्हा तिथे दारू पार्टी सुरु होती. पोलिसांनी हॉटेलच्या खोलीतून चार तरुण आणि दोन महिलांना अटक केली आहे.पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध दारूबंदी असलेल्या राज्यात दारू पिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सासरच्यांनी सुनेच्या दारू पार्टीवर छापा टाकल्याने हा प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. हा प्रकरण गुजरातमधील सुरतमध्ये घडली आहे.
पत्नी नांदायला येत नसल्याचा पतीला राग आला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार
नेमकं काय घडलं?
सून तिच्या मित्र मंडळींसह एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी करत होती. याची माहिती सासऱ्याने पोलिसांना कळवली. यानंतर पोलिसांनी एका मोठ्या आलिशान हॉटेलातील रूममध्ये धाड टाकली. त्यावेळी तिथे दारू पार्टी सुरु असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सूरतमधील एका प्रतिष्ठित घराण्यातील सुनेने आपल्या मित्रमैत्रिणींसोबत एका आलिशान हॉटेलमध्ये दारू पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र पोलिसांनी अचानक धाड टाकल्याने पार्टीवर पाणी फेरलं गेलं आणि संबंधित महिलांना रंगेहात अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टी डुमस बीचजवळील ‘हॉटेल वीकेंड अॅड्रेस’ येथे रूम क्रमांक ४४३ मध्ये सुरु होती. पोलिसांनीं गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. तेव्हा पार्टीमध्ये मद्यपान चालू असल्याचे दिसले. पोलिसांनी कारवाईदरम्यान महागड्या स्कॉच व्हिस्कीच्या बाटल्या आणि सुमारे 2.55 लाख रुपयांचे सात स्मार्टफोन जप्त केले. विशेष म्हणजे, पार्टीमध्ये सहभागी असलेल्या कोणाकडेही दारू पिण्याचा परवाना नव्हता. पोलिस तपासात हे समोर आलं आहे की अटक करण्यात आलेल्या दोघी महिला व्यावसायिक कलाकार (Artists) आहेत. त्यातील एक महिला सूरतच्या एका मोठ्या व्यावसायिक घराण्याची सून आहे.
गुप्त कॉलद्वारे मिळाली माहिती
पोलिसांना मिळालेल्या गुप्त कॉलमध्ये एका इसमाने सांगितलं की, “माझी सून तिच्या मित्रमंडळींसोबत हॉटेलमध्ये दारू पार्टी करत आहे.” कॉलरने हॉटेलचं नाव, पार्टीचं ठिकाण आणि रूम नंबर 443 अशी सर्व माहिती पोलिसांना दिली. सासऱ्याला यापूर्वीही सुनेच्या दारू पार्ट्यांची माहिती मिळाली होती. त्यामुळे तो त्रस्त झाला होता. यावेळी त्याने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि कारवाई करण्यासाठी माहिती दिली.
गुन्हा दाखल
सुरत शहर पोलिस एसीपी दीप वकील यांनी सांगितलं की, सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुजरात मद्यनिषेध (संशोधन) अध्यादेश 2016 अंतर्गत कलम 66(1)(B), 65(A), 81 आणि 83(A) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे सूरतमधील उच्चभ्रू समाजात खळबळ उडाली आहे.
Phaltan Crime News : चिमुरडीला मामाकडून अमानुष मारहाण, फलटणमधील संतापजनक प्रकार