संग्रहित फोटो
पुणे : पत्नी नांदायला न आल्याच्या रागातून तिचा गळा चिरून निर्घृण खून केल्यानंतर पसार झालेल्या पतीला विमानतळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. खांदवेनगर परिसरात ही घटना घडली होती. प्रेम उत्तम जाधव (रा. खांदवेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, ममता प्रेम जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. २७ जुलै रोजी रात्री ही घटना घडली होती.
ममता ही काही दिवसांपासून माहेरी राहत होती. नांदायला येत नव्हती. या कारणावरून आरोपी प्रेम जाधवने संतापाच्या भरात तिच्यावर हल्ला करत तिचा जीव घेतला. खून केल्यानंतर आरोपी पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देत आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानेश्वर आवारी, शैलेश नाईक, दादासाहेब बर्डे, रूपेश पिसाळ यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
सेनापती बापट रस्त्यावर टोळक्याचा तरुणावर हल्ला
सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकाजवळच भररस्त्यात गाडीला साईड देण्यावरून वाद घालत कारमधील तिघांनी एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेदम मारहाण करून त्याच्यावर शस्त्रानेही सपासप वार केले आहे. नंतर टोळके पसार झाले आहे. केवळ साईड देण्यावरून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने शहरात भितीदायक वातावरण असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. पृथ्वीराज कुमार नरवडे (वय १९, रा. भोसलेनगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश प्रमोद पवार (वय २९), रोहित अशोक धोत्रे (वय २४), आकाश विलास कुसाळकर (वय ३४, रा. वडारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून, याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात भावाने केला भावावर गोळीबार
पुण्यातील वाघोली भागातील केसनंद परिसरात चुलत भावावरच जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून, गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुशील संभाजी ढोरे (वय ४२ वर्षे,रा. ढोरेवस्ती, केसनंद,नगर रस्ता) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव, भिवराज सुरेश हरगुडे (तिघे रा. केसनंद, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.