पिस्तूलाच्या साहाय्याने खुनाचा प्रयत्न करणारे जेरबंद; स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून पकडलले
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्राच्या सहाय्याने खूनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तर, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १ पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.४) रात्री ही घटना घडली होती. तिघांनी जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला केल्याचे कबूल केले आहे.
प्रकाश ऊर्फ पक्या तुळशीराम पवार (वय २३, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत राहुल किरण ढोले (रा. गुलटेकडी) यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे निरीक्षक विकास भारमळ, अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, विक्रम सावंत, शंकर संपते, सागर केकाण यांच्यासह पथकाने केली.
शुक्रवारी रात्री स्वारगेट परिसरात तक्रारदार आणि स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत सचिन माने यांच्यावर देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्राने हल्ला करून खूनाचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान गुन्ह्यातील संशयित हे व्हीआयटी होस्टेल चौक, अप्पर इंदिरानगर परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी जगताप आणि दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. आरोपींकडे पिस्तूल कुठून आले आणि यापूर्वी त्याचा वापर झाला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.