
image
ठाणे : घोडबंदरजवळील चेना जंगलात बेकायदेशीर शिकारीसाठी गेलेल्या एका गटातील गैरसमजातून साथीदाराचाच गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधारात बॅटरीचा प्रकाश प्राण्याचे चमकणारे डोळे समजून एका व्यक्तीने गोळी झाडली. मात्र, ही गोळी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी विजय सुखरू सापटे यांच्या छातीत लागली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारात अन्य दोघे जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, घटनेनंतर घाबरलेल्या साथीदारांनी पोलिसांना माहिती न देता सापटे यांच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे भासवण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रही मिळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी डॉक्टरसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
१९ ऑक्टोबरच्या रात्री काही जण बेकायदेशीरपणे शिकारीसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या चेना बीटमध्ये गेले होते. त्यांच्याकडे बंदुका, छर्रे आणि जंगलात मार्ग दाखवण्यासाठी बॅटऱ्या होत्या. जंगलात पोहोचल्यानंतर हा समूह दोन गटांत विभागला. याचदरम्यान एका गटातील बॅटरीचा प्रकाश दुसऱ्या गटावर पडला. अंधारात चमकणारा हा प्रकाश प्राण्याचे डोळे असल्याचा गैरसमज झाला. कोणतीही शहानिशा न करता एका व्यक्तीने बंदुकीचा ट्रिगर दाबला. गोळी थेट विजय सापटे यांच्या छातीत लागली. ते जागीच कोसळले. या घटनेवेळी सापटे यांचा अल्पवयीन मुलगाही घटनास्थळी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. गोळीबारात कल्पेश ढंगाळा आणि कुणाल शेलार हे दोघेही जखमी झाले. त्यांना काशिमीरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सहकाऱ्याचाच मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर गटातील सदस्य घाबरले. पोलिसांना माहिती दिल्यास आपण अडचणीत येऊ, या भीतीने त्यांनी विजय सापटे यांच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना कोणतीही माहिती न देता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतकेच नव्हे तर सापटे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे दाखवण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यात आल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान स्थानिक काशिमीरा पोलिस आणि वन विभागाच्या यंत्रणेने या घटनेचा छडा लावला. बनावट प्रमाणपत्र देणारा डॉक्टर राजेश पालांडे याच्यासह एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले बेकायदेशीर शस्त्र नेमके कोणाचे होते, गोळी नेमकी कोणी झाडली आणि शिकारीसाठी गेलेल्या या गटातील इतर सदस्यांची भूमिका काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Ans: ठाण्यातील घोडबंदरजवळील चेना जंगलातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात ही घटना घडली.
Ans: अंधारात बॅटरीचा प्रकाश प्राण्याचे चमकणारे डोळे समजून एका व्यक्तीने गोळी झाडली. ही गोळी विजय सापटे यांना लागली.
Ans: पोलिसांना माहिती न देता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे दाखवण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप आहे.