संतोष देशमुख यांची हत्या केल्याची आरोपींनी दिली कबुली; कारण सांगत म्हटलं देशमुखांनी...
बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड गँगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी अटकेत असलेले सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी असलेल्या सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितला. सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्याप्रकरणात आपला सहभाग असल्याचे नाकारत होता. मात्र, पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलायला लागला. सुदर्शन घुले याने, ‘होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला’, अशी कबुली पोलिसांना दिली.
तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली. आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे आता या सगळ्यांचा आका असलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचे दिसत आहे.
संतोष देशमुख याने केली होती मारहाण
आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनात होता, असेही आरोपीने सांगितले आहे.
आरोपी कुठं-कुठं गेले याची दिली कबुली
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे घटनेच्या दिवसांपासून फरार होते. मात्र, नंतर या दोघांनाही अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान या दोघांनी गेल्या काही दिवसात कुठे-कुठे गेले, काय-काय केलं, इतके दिवस कुठे राहिले यावर खुलासे केले आहेत. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर इंगळे फरार झाले होते. नंतर त्यांना अटक झाली.