
बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
बीड : प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणे, अन्नपदार्थांच्या निर्मिती व विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २४ सप्टेंबर रोजी बीड शहरात दोन ठिकाणी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, जालना रोडवरील चहा-नाश्ता सेंटरमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
बशीरगंज येथील जमील पान सेंटरवर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान प्रतिबंधित गोवा आणि बाओबाजी पानमसाल्यासह ५ हजार ६०८ रुपयांचा गुटखा व पानमसाला आढळून आला. याप्रकरणी पानटपरीचालक सैयद मुशरत अली सैयद हमीद अली आणि विक्रेता शेख तोहिद अफसर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी जिल्हा रुग्णालयासमोरील कमानीजवळील चहा व भजीच्या ठेल्यावरही तपासणी करण्यात आली. खाकी रंगाच्या पुठ्यात विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळला. याप्रकरणी ठेला चालक शेख माजेद शेख खालेद याच्याविरुद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
२७ जुलै रोजी बीड शहरातील साठे चौकातील मे. अप्पा चहा नाश्ता सेंटरची तपासणी करण्यात आली होती. या ठिकाणी उंदराची प्रतिबंधक व्यवस्थेचा अभाव, विष्धा, कीटक पाण्याच्या तपासणीचा अहवाल नसणे, भांडी धुण्याच्या जागेवर अन्न शिजवणे, नॉन- फूड ग्रेड पिशव्या व वृत्तपत्र कागदाचा वापर, अवैध कृत्रिम रंगांचा वापर आणि कामगारांकडून तंबाखू सेवन अशा गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
गुटखा विक्रीवर कारवाई सुरूच
प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची विक्री करणाऱ्यांविरोधात बीड शहरासह जिल्ह्यात तपासणी व कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेवर पथकाने लक्ष केले केंद्रीत
हॉटेल, चहा-नाश्ता केंद्र आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन अथवा आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या त्रुटी आढळल्यास संबंधित आस्थापनेवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.