सौजन्य - नवराष्ट्र टीम
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे सुरू असलेल्या भेसळयुक्त मँगो पल्पच्या गोरखधंद्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राक्षेवाडी येथील अविष्कार एंटरप्रायझेस या मूळ पुरवठादाराकडून तसेच मावळ तालुक्यातील उरसे येथे महंमद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम यांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या ठिकाणी मँगो पल्प तयार करण्यासाठी वापरली जाणारी भेसळयुक्त साखर, गाईचे दूध, तसेच केमिकलयुक्त ‘केशर कलर’ मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे.
स्वस्त आमरस, पण जीवाला घातक!
सध्या ग्रामीण भागात स्वस्त दरात—फक्त १०० रुपयांत किलोभर मँगो पल्प—उपलब्ध होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करत आहेत. मात्र, या स्वस्त दरामागे लपलेली भेसळ आणि केमिकल्सची भीषण वास्तवता आता समोर आली आहे. हा पल्प नैसर्गिक नसून पूर्णपणे कृत्रिम घटकांपासून तयार केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
आरोग्यास गंभीर धोका
तज्ज्ञांच्या मते, अशा भेसळयुक्त पल्पच्या सेवनामुळे जुलाब व उलट्या, पोटदुखी, अन्नातून विषबाधा यांसारख्या तात्काळ त्रासांसोबतच, दीर्घकाळात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढू शकतो. विशेषतः कृत्रिम रंगांचा अतिवापर शरीरासाठी अत्यंत घातक ठरतो.
३,२८२ किलो पल्प नष्ट
या कारवाईदरम्यान तब्बल ३,२८२ किलो भेसळयुक्त व केमिकलयुक्त मँगो पल्प जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. या पथकात सहायक आयुक्त ना. रा. सरकटे, दक्षता विभागाचे अधिकारी वा. औ. शिंदे, स्वा. दा. मस्के, प्र. शि. कच्छवे यांचा समावेश होता.
ग्राहकांनी सतर्क राहावे!
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अतिशय स्वस्त दरात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांपासून सावध राहावे आणि केवळ विश्वसनीय व प्रमाणित ठिकाणांहूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत. ही कारवाई म्हणजे केवळ एका ठिकाणाचा पर्दाफाश नसून, संपूर्ण भेसळ माफियाला दिलेला इशारा मानला जात आहे.






