सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : जलसंपदा विभागाकडून पाणी कपातीबाबत सूचना मिळाल्यानंतर पुणे शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली असून, महापालिकेकडून पाणी बचतीसाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करताना आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवणे किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो लवकरच महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी याबाबत माहिती दिली. जलसंपदा विभागाकडून आलेल्या पत्रात यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी घटणार असल्याचा उल्लेख आहे. परिणामी, उपलब्ध जलसाठ्यावर ताण येण्याची शक्यता असून, पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास सुमारे १० ते १५ टक्के पाण्याची बचत होऊ शकते, असे प्राथमिक गणित प्रशासनाने मांडले आहे. याशिवाय दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचाही पर्याय विचाराधीन आहे. पुढील तीन महिन्यांसाठी तरी अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेतील सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. नागरिकांवर होणारा परिणाम, विविध भागांतील पाणीपुरवठ्याची स्थिती आणि पर्यायी उपाययोजनांचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गळती, अपव्यय रोखण्यावर भर देणार
पाणी गळती रोखणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पुनर्वापराच्या उपाययोजना राबविणे यावर भर दिला जाणार आहे. महापालिकेकडून प्रस्तावित उपाययोजनांमुळे पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी नागरिकांनीही सहकार्य करून पाणी वापरात काटकसर करणे आवश्यक ठरणार आहे. आगामी काळात पावसाचे प्रमाण कसे राहते, यावर पुढील धोरण अवलंबून राहणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
सिंचन प्रकल्पांना गती देणार : विखे पाटील
पाबळ (ता. शिरुर) सह परिसरातील १२ दुष्काळी गावांच्या कायमस्वरुपी पाणीपूरवठ्याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (दि. १०) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली असताना १२ गावांसाठीच्या पाणी उपलब्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या बंद पाईपलाईनद्वारे योजनेला येत्या ३० जुनपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पाबळ (ता. शिरुर) सह परिसरातील १२ दुष्काळी गावांच्या कायमस्वरुपी पाणीपूरवठ्या बाबतची महत्त्वपूर्ण बैठक आमदार राहुल कुल यांच्या पुढाकाराने पार पडली. यावेळी जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्य अभियंता एस. सी. धुमाळ, भाजपा नेत्या जयश्री पलांडे, शेखर पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, अॅड. अशोक पलांडे, सतीश पाचंगे, समरजीत गायकवाड, दिपक खैरे, विकास गायकवाड, राहुल कदम, बापूसाहेब धुमाळ, आदित्य सासवडे, गणेश कामठे, पंकज गायकवाड यांसह आदी उपस्थित होते.






