ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना
राज्यात ओला, उबर आणि अन्य अॅग्रीगेटर कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक व्यवसायाचा विस्तार होत असताना स्वतंत्र टॅक्सी चालकांना प्रवास मिळण्यात, उत्पन्न मिळविण्यात आणि मोठ्या फ्लीट ऑपरेटरशी स्पर्धा करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यमान व्यवस्थेतील त्रुटी दूर करून सर्व चालकांना समान संधी देणारी, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सादरीकरणातून अधोरेखित केली.
अॅपच्या माध्यमातून चालकांना प्रवासाचे वाटप करताना वापरण्यात येणाऱ्या अल्गोरिदमची कार्यपद्धती स्पष्ट नसल्याची तक्रार स्वतंत्र चालकांकडून केली जाते. विमानतळासारख्या प्रमुख ठिकाणांहून मिळणाऱ्या अधिक उत्पन्नाच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या फ्लीट ऑपरेटरच्या चालकांना प्राधान्य मिळत असल्याची, तर स्वतंत्र चालकांना तुलनेने कमी उत्पन्नाच्या फेऱ्या मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रवास वाटपाची प्रणाली पारदर्शक असावी आणि कोणत्याही चालकावर अन्याय होणार नाही, यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समान संधी उपलब्ध करून देण्याची गरज मांडण्यात आली.
स्वतंत्र चालकांच्या किरकोळ चुकांवर खाते बंद करणे किंवा निलंबनासारखी कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे, मोठ्या फ्लीट ऑपरेटरच्या बाबतीतही समान निकषांनुसार कारवाई होते का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एव्हरेस्ट फ्लीट्स, मूव्ह फ्लीट आणि कॅर्रम फ्लीट यांसारख्या मोठ्या फ्लीट ऑपरेटरना मिळणाऱ्या कथित प्राधान्यामुळे स्वतंत्र चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्व चालकांसाठी समान नियम, समान निकष आणि निष्पक्ष कार्यपद्धती असण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
प्रवासाचे भाडे निश्चित करणे, प्रोत्साहनपर रक्कम देणे, चालकांचे मूल्यांकन करणे आणि प्रवास वाटप करणे या प्रक्रियांमध्ये पारदर्शकता असावी. तसेच चालकांना मिळणारे उत्पन्न, कामाचे तास, विमा संरक्षण, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) यांसारख्या सामाजिक सुरक्षाविषयक बाबींची स्पष्टता असावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रवास वाटप, जिओ-फेन्सिंग, लाइव्ह जिओ-लोकेशन आणि वाढीव भाडे निश्चिती यांसारख्या तांत्रिक प्रणालींचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता देखील सादरीकरणातून मांडण्यात आली. या प्रणालींच्या कार्यपद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवून त्यांचा वापर सर्व चालकांच्या हितासाठी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
समुच्चय वाहन धोरणाचा उद्देश केवळ अॅग्रीगेटर कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक नियंत्रित करणे नसून, स्वतंत्र टॅक्सी चालकांसह सर्व संबंधित घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवास वाटपात पारदर्शकता आणणारा आणि मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव टाळणारा प्लॅटफॉर्म विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या व्यवस्थेमुळे स्वतंत्र टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण होण्यास, स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसायाच्या समान संधी मिळण्यास आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रात न्याय्य स्पर्धा निर्माण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारी सेवा मिळावी, यासाठी समुच्चय वाहन धोरणाची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील राहणार आहे.
Ans: ॲपआधारित वाहतूक सेवा क्षेत्रात सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून समुच्चय वाहन धोरण प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Ans: स्वतंत्र टॅक्सी चालकांना न्याय मिळावा आणि ॲपआधारित टॅक्सी सेवा क्षेत्रात त्यांना समान संधी मिळावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सादरीकरण केले.
Ans: ॲपआधारित टॅक्सी सेवांचे नियमन करणे, चालकांच्या हिताचे संरक्षण करणे, भाडे आणि सेवा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे तसेच प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हा या धोरणाचा उद्देश आहे.






