रिक्षाचालकाने रिक्षातील प्रवाशालाच लुटलं; जिवे मारण्याची धमकी दिली अन्...
पुणे : राज्यात लुटमार करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून लुटमारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. परगावाहून संगमवाडी येथील बस थांब्यावर उतरलेल्या प्रवासी तरुणाला धमकावून रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी रिक्षाचालकासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २७ वर्षीय तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रिक्षाचालकासह साथीदारांवर गु्न्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण चिंचवड परिसरात राहायला आहे. तो परगावी गेला होता. १५ फेब्रुवारी रोजी तो मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास बाहेरगावाहून संगमवाडी येथील थांब्यावर उतरला. त्यानंतर त्याने येथे उभा असलेल्या आरेपी रिक्षाचालकाकडे पत्ता विचारला. रिक्षाचालकाने तरुणाला आम्हीही तिकडेच निघालोत, तुलाही सोडतो असे म्हणत त्याला रिक्षात घेतले. रिक्षात तिघे आधीच बसलेले होते. तरुण रिक्षात बसल्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेले. त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या कानातील बाळी, सोनसाखळी असा ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. सुर्वे तपास करत आहेत.
जाब विचारणाऱ्याचा मोबाईल पळविला
चतु:श्रृंगी येथील एसबी रोडवर गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याच्या रागातून टोळक्याने एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. १५ फेब्रवारी रोजी रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला पुण्यात लुटले
राज्यात लुटमारीच्या घटना प्रमाणात उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली गुजरातमधील पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाचे अपहरण करुन त्याला नदीपात्रात लुटण्यात आले. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बलभद्रसिंग नटवरसिंग जाडेजा (वय २५, सध्या रा. नलावडे सदन, गावकोस मारुतीजवळ, कसबा पेठ, मूळ रा. कच्छ, गुजरात) याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.