बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या, पोटात चाकू खुपसून संपवलं; कारणही आलं समोर
बीड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबताना दिसत नाहीत. सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यापासून अनेक गुन्हेगारी घटना उघडकीस येत आहेत. सतत घडणाऱ्या गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीड शहरात एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. यश देवेंद्र ढाका असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे. वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून धारदार शस्त्राने पोटात चाकू खुपसून यशची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली आहे. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. महिन्याभरापूर्वी यश आणि सुरज काटे या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले. त्यामुळे त्यांच्यात वैमानस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचे कारण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली आहे. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनीअरिंगचे) शिक्षण घेत होता. वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करत आहे. दरम्यान या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
हे सुद्धा वाचा : कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्यामुळे राग अनावर; दोघांवर चाकूने सपासप वार केले अन्…
महिन्यापूर्वीही झाला होता वाद
यश आणि सूरज या दोघांमध्ये साधारण एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते, त्यामुळे त्यांच्यात खुन्नस होती. गुरुवारी रात्रीही माने कॉम्प्लेक्स परिसरात त्यांच्यात वाद झाले. यावेळी सूरजने सोबत असलेला चाकू काढून थेट यशच्या छातीत खुपसला. यात रक्तबंबाळ होऊन यश खाली कोसळला होता. त्यानंतर यशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तर सूरज हा फरार झाला होता.