बोपदेव घाटातील आठवणी ताज्या; वारंवार घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सासवड/संभाजी महामुनी : अत्यंत सुशिक्षित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात अगदी मध्यभागातील स्वारगेट एसटी बस स्थानकात एका युवतीवर बसमध्येच अत्याचार केल्याची घटना घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्याबरोबरच काही महिन्यापूर्वी पुणे पोलिसांच्या हद्दीतील बोपदेव घाटामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. एकंदरीतच वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पुणे आता महिलांसाठी सुरक्षित राहिले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे आणि पुरंदर तालुक्याला जोडणाऱ्या बोपदेव घाटात काही महिन्यापूर्वीच एका युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी सतर्क होत घाटाच्या सुराक्षतेबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात केली. यानंतर अद्यापपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र घाटाचा एकंदरीत परिसर आणि पोलीस प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पाहता घाट किती दिवस सुरक्षित राहील? याबाबत सांगणे कठीण आहे. कारण तातडीच्या मदतीसाठी जी पोलीस चौकी उभारण्यात आलेली आहे. त्यामध्ये पोलीस कर्मचारी येत असले तरी नियमित येत नाहीत. तसेच संपूर्ण घाटात पेट्रोलिंग न करता केवळ नावापुरतीच उपस्थिती असल्याचे अनेक नागरिक नियमितपणे पाहत आहेत.
पोलिसांची कारवाई तात्पुरती
बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलिसांनी प्रेमी युगुलांना रात्री उशिरापर्यंत थांबण्यास मनाई केली. मात्र काही दिवस जाताच पुन्हा प्रेमी युगुलांची संख्या दिसून येत आहे. त्याच बरोबर रस्त्यावर किरकोळ विक्रेते विविध खाद्य पदार्थ घेवून विक्रीसाठी बसत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतच आहे. विशेष म्हणजे सुरक्षेसाठी उभारलेली पोलीस चौकी घाटापासून काही अंतरावरती जवळपास माथ्यावर येत आहे. तर प्रेमी युगुले घाटाच्या दुसऱ्या, तिसऱ्या वळणावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. तसेच युगुले रात्री उशिरापर्यंत घाटातच बसल्याचे दिसत असल्याने पोलिसांची कारवाई केवळ तात्पुरती आणि दिखावूपणाची आहे का ? त्यामुळे अशा घटना पुन्हा घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिवे घाटातही हीच परिस्थिती
बोपदेव घाट प्रमाणेच दिवे घाटातही हीच परिस्थिती दिसून येत आहे. यापैकी बोपदेव घाट पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत येत असून दिवे घाट लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने सासवड पोलिसांना कारवाई करताना मर्यादा येत आहेत. मात्र दिवे घाटातही अशीच युगुले रात्री उशिरापर्यंत अगदी मद्यपान करताना वाहन चालकांना दिसून येत आहेत. सध्या घाटाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे, मात्र घाटाच्या पहिल्याच वळणावर हातगाड्या लावून विक्रेते बसत असल्याने कित्येकदा वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.
घाटातील विक्रेत्यांवर बंदी कधी येणार?
पुरंदरकडून पुण्याकडे जाणारा दिवे घाट आणि कात्रजकडे जाणाऱ्या बोपदेव घाटात व्यावसायिक गर्दी करीत असल्याने घाटातून प्रवास करणारे वाहनचालक तिथे थांबत आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून गाड्यांचा एकमेकांना धक्का लागण्यावरून अनेकदा बाचाबाची होत असते. परंतु घाटात रस्ता अडवून व्यवसाय करणारे पूर्णपणे बेफिकीर असून पोलीस यंत्रणेला याचा तपास नाही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे घाटातील व्यावसायिकांवर कारवाया करून तातडीने बंदी घालण्याची गरज आहे.
बोपदेव घाटात यापूर्वी अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. तसेच कित्येक घटनात गुन्हेगारांनी पळून जाण्यासाठी पुरंदर मधून मार्ग अवलंबिले असल्याने सासवड पोलिसांच्या वतीने दिवे आणि बोपदेव घाट परिसरात दररोज गस्त घालण्यात येते. सासवड पोलीस ठाण्याची हद्द मोठी असून त्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी आहे. मात्र तरीही आमचे कर्मचारी वाघापूर रोड, पांगारे रोड, नारायणपूर रोड, चीव्हेवाडी घाट, गराडे रोड, कोडीत रोड अशा सर्वच रस्त्यांवर पेट्रोलिंग करून नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
– ऋषिकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक, सासवड.
एकीकडे लाडकी बहिण म्हणून १५०० रुपये द्यायचे, परंतु राज्यातील लाडक्या बहिणी, माता, मुली सुरक्षित नसतील तर १५०० रुपयांचा काय उपयोग ? स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला चौकात फाशी द्या. नाही तर राज्यात शिवशाही बस रत्यावर फिरकू देणार नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी.
– सुरेखा ढवळे, महिलाध्यक्षा प्रहार अपंग संघटना