
वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अनिल तमा गायकवाड (वय ३२, रा. थिटेनगर, खराडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार सतीश गायकवाड, सुमित ऊर्फ सुमाड्या सतीश गायकवाड आणि सनी सतीश गायकवाड (तिघे रा. कटकेवाडी फाट्याजवळ, वाघोली, पुणे) हे अद्याप पोलिसांना पाहिजे आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृद्ध पीएमपी बसमधून प्रवास करीत असताना आरोपींनी गर्दीचा फायदा घेतला. अनिल गायकवाड याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी दाताने तोडून चोरली. त्यानंतर चौघेही पसार झाले. चोरीला गेलेल्या सोनसाखळीची किंमत एक लाख ४५ हजार रुपये आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एककडून सुरू होता.
पोलिस अंमलदार केशव चेपटे आणि सोहेल चिखलकर यांना गोपनीय बातमीदाराकडून आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वेताळ, पोलिस हवालदार देवा राऊत आणि मनोज राठोड यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून संशयिताचा माग काढण्यात आला. त्यातून अनिल गायकवाड याला निष्पन्न करून गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी पिंपरी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अनिल गायकवाड याच्यावर यापूर्वी चंदननगर पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहायक उपनिरीक्षक प्रमोद वेताळ, पोलिस हवालदार देवा राऊत, मनोज राठोड, पोलिस अंमलदार केशव चेपटे आणि सोहेल चिखलकर यांनी ही कामगिरी केली आहे.